मानवाने उलगडले धर्मावर भाष्य करणारे मानवतेचे ‘मर्म’
प्रा. रवींद्र काळे यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘मर्म’ ने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध
नाट्य समीक्षण
अविनाश कराळे
21व्या शतकात काळानुसार जातीच्या भिंती तोडून माणसं माणसांशी माणसारखं वागताना कुठेच दिसत नाही. शिक्षणाचा प्रचार, विज्ञान- तंत्रज्ञानाचा प्रसार व जागतिकीकरणामुळे बदलेल्या शिष्टाचाराबरोबरच आपली जन्माधिष्ठित उच्च-नीचता अधिकाधिक घट्ट होत आहे. मनुष्य जन्माला आल्यापासून जात-पात, धर्म-पंथ जोडणाऱ्या मानवनिर्मित व्यवस्थेचे काम वर्षानुवर्षे सुरू आहे. कारण सामाजिक प्रवाहाविरुद्ध पोहणे हे रॉकेट सायन्सप्रमाणे अगदीच कठीण काम असल्याचे सामान्यांना वाटते, म्हणून ते सामान्यच राहतात. शिवाजी जन्माला यावा पण दुसऱ्याच्या घरात असे समजून मग कुठल्यातरी असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या खंबीर नेतृत्वाची आपण वाट पाहत बसतो. असाच त्याग, मानवता, सेवा आणि सत्याचा संदेश देणारे प्रा. रवींद्र काळे लिखित आणि रियाज पठाण व प्रा. रवींद्र काळे दिग्दर्शित ‘मर्म’ हे दोन अंकी नाटक राज्य नाट्य स्पर्धेत बुध. दि. 04 डिसें. रोजी सादर झाले.
सेवानिवृत्त प्राध्यापक मानव (प्रा. रवींद्र काळे) च्या स्वगताने नाटकाचा पडदा उघडतो. कथा, कविता, गझल, भाषण अन नाटकांत रमणारा मानव कोणतीही जात धर्म न मानता माणूसकी हाच खरा धर्म मानणारा असतो. एकमेकांवर नितांत प्रेम असणाऱ्या गगन (ॲड. माधव भारदे) आणि भूमी (शुभदा पटवर्धन) या विद्यार्थ्यांसाठी मानव हा आदर्श आणि प्रेरणास्थान असतो.
ॲड. सन्मित्र (रियाज पठाण) हा मानवचा कौटुंबिक मित्र त्याला सर्व कायदेशीर बाबींमध्ये मदत करत असतो. तारुण्यात अनुशीला नामक तरुणीवर प्रेम करणारा मानव तिने दुसऱ्या पुरुषाशी विवाह केल्यानंतर ही तिच्याबद्दल प्रामाणिक विचार करत असतो. समाजाची कोणतीही पर्वा न करता वेश्यावस्तीतील महिला आणि मुलांसाठी मानव कार्य करत असतो.
माणूसकी (हर्षदा वाघमारे) या लहान मुलीवर जॉन, बशीर आणि रंगा या तीन वेगवेगळ्या धर्मातील नराधमांनी अतिप्रसंग केल्याचे मानवच्या निदर्शनास येते. मानव त्या नराधमांना त्यांच्या आवाजावरून शोधून काढून पोलिसांच्या हवाली करतो. अतिप्रसंग करणाऱ्या आपापल्या कार्यकर्त्यांना सोडविण्यासाठी रॉबर्ट (जयदेव हेंद्रे), अब्बास (मंगेश शिदोरे) आणि रघू (महेश काळे) हे तिघेजण मानवला हरतऱ्हेने व शेवटी धमकी देऊन केस मागे घेण्याचे सांगून पैशांचे अमिष दाखवतात. परंतु कोणत्याही अमिषाला बळी न पडता मरणाची भीती नसणारा मानव शेवटपर्यंत केस लढतो व अतिप्रसंग करणाऱ्या तीन नराधमांना फासावर लटकवतो. लढा यशस्वी झाल्याबद्दल ऍड.सन्मित्र, गगन आणि भूमी पेढा भरवून मानवला शुभेच्छा देतात आणि पडदा पडतो.
वैशिष्ट्यपूर्ण दिग्दर्शन व पात्रांची योग्य निवड
प्रा. रवींद्र काळे यांनी सर्व धर्माचा गाढा अभ्यास असणारा मानव चोख पाठांतर अन लांब पल्ल्याच्या संवादाची अचूक शब्दफेक करत उत्तम साकारला. भावावस्था व वास्तव याचे सादरीकरण अभिनयाच्या माध्यमातून बेमालूमपणे सादर करून प्रा. काळे ही भूमिका जगले. माधव भारदे यांनी साकारलेला गगन उत्तम. शुभदा पटवर्धन हिने अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या बळावर भूमी हे पात्र अत्यंत सुरेखरित्या साकारले. जिवलग मित्र, आग्रही भूमिका मांडणारा, प्रसंगी मित्रास समजून घेणारा ॲड.सन्मित्र रियाज पठाण यांनी उभा केला. जयदेव हेंद्रे यांनी रॉबर्ट, मंगेश शिदोरे यांनी अब्बास आणि रघु या पात्रास महेश काळे यांनी उत्तम न्याय दिला. एकाच प्रसंगात आलेली हर्षदा वाघमारे हिने माणुसकी आणि राजकुमार मोरे यांनी वडिलांची भूमिका उत्तम निभावली.
तांत्रिक बाबी अभ्यासपूर्ण अपेक्षित
रियाज पठाण आणि प्रा. रवींद्र काळे यांनी दिग्दर्शन करताना सर्वच पातळ्यांवर तपशीलवार काम केल्याचे दिसून येते. उमेश गोसावी आणि परवीन पठाण यांचे सुखवस्तू घराचे साकारलेले नेपथ्य उत्तम. गणेश लिमकर यांनी प्रकाशयोजना चांगली केली परंतु प्रसंगानुरूप प्रकाशझोताची असणारी रंगसंगती अभ्यासपूर्ण असायला हवी होती. वेदश्री देशमुख आणि प्रा.आदेश चव्हाण यांचे वास्तवाचे भाव असणारे दैनंदिन जीवनातील संगीत भावले. चव्हाण यांच्या गायनाने नाटकात रंगत आली. सोहम सैंदाणे यांची रंगभूषा अनुरूप. अविनाश डोंगरे आणि बाबासाहेब डोंगरे यांनी वेशभूषा करताना काही बारकावे लक्षात घेणे आवश्यक होते. माणुसकीच्या वडिलांची वेशभूषा मोलमजुरी करणाऱ्या व्यक्तीची न वाटता सुखवस्तू घरातील व्यक्ती वाटली.