हॉलमार्किंग व्यावसायिकाची 18.31 लाखांची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

नगर (प्रतिनिधी) – गंज बाजारातील सूर्या हॉलमार्किंग या दागिने हॉलमार्किंग व्यवसाय करणाऱ्या राजेश बाळासाहेब भोसले (रा. सारसनगर) यांची 18 लाख 31 हजार 299 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सीए सचिन आप्पासाहेब दुधाडे (रा. भिस्तबाग, तपोवन रोड), सीए देवेंद्र अण्णासाहेब पाटील (रा. यशोदानगर पाईपलाईन रोड) आणि सोनाली लोणकर (अर्णव एंटरप्राइजेस, पुणे) यांच्यावर फसवणुकीचा आरोप आहे.
बनावट करप्रत्यय पत्र आणि 18.31 लाखांचा अपहार
राजेश भोसले व त्यांच्या भावाने 2021 पासून सूर्या हॉलमार्किंग नावाने व्यवसाय सुरू केला होता. कर व आर्थिक कामकाजासाठी त्यांनी दुधाडे आणि पाटील या दोघा सीएंची नियुक्ती केली होती. यासाठी वेळोवेळी त्यांनी चेक, आरटीजीएस व रोख स्वरूपात एकूण 18.31 लाख रुपये त्यांच्या ताब्यात दिले.
या दोघांनी जीएसटी व इन्कम टॅक्स रिटर्न नियमित भरल्याचे खोटे अहवाल आणि बनावट कागदपत्रे भोसले यांना दिली. मात्र डिसेंबर 2024 नंतर भोसले यांनी अधिक तपासणी केल्यावर संबंधित कर कार्यालयाकडून कोणताही जीएसटी भरलेला नसल्याचे आणि सादर केलेले सर्टिफिकेटही बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
व्यवसायावर 38 लाखांचा दंडाची टांगती तलवार
या फसवणुकीमुळे आता भोसले यांच्या हॉलमार्किंग फर्मवर सुमारे 38 लाख रुपयांचा दंड व व्याज भरावे लागणार आहे. तपासादरम्यान पुण्यातील अर्णव एंटरप्राइजेस फर्मची भागीदार सोनाली लोणकर हिचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.
कायदेशीर कारवाई
भोसले यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 316 (2), 318 (4), आणि 3 (5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.
या फसवणूक प्रकरणामुळे व्यवसायिक व कर सल्लागार यांच्यातील पारदर्शकतेच्या गरजेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.