क्रीडा व मनोरंजन

भक्तिरसात न्हाऊन निघाले : ‘झिम पोरी झिम’ 

अनुरूप संगीत अन समरस गाण्यांमुळे नाटकाला मिळाली उंची.  

नाट्य समीक्षण

अविनाश कराळे

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या नगर केंद्रावर समारोप गुरु. दि. 12 डिसें. रोजी झाला. जय बजरंग युवा सांस्कृतिक क्रिडा ग्रामीण शैक्षणिक मंडळाने शेवटचे नाटक सादर केले. जयसिंग पाटील लिखित आणि संजय लोळगे दिग्दर्शित ‘झिम पोरी झिम’ या दोन अंकी नाटकाने स्पर्धेचा समारोप झाला. 

या नाटकातून विठ्ठल आणि तुळशीच्या नात्यातील भक्ती-भाव अन प्रेमावर भाष्य करण्यात आले आहे. पंढरीच्या विठ्ठल रखुमाईला समस्त भक्तांनी देवपण बहाल केले. ते देव असले तरी मानवी नातेसंबंधातील ताणेबाणे, रुसवे-फुगवे, अडीअडचणी त्यांनाही चुकल्या नाहीत. देव हा देव असला तरी त्याच्यातही आपल्यासारखाच माणुस आहे. त्यालाही लढणे-झगडणे हे क्रमप्राप्त आहेच, हाच आशय ‘झिम पोरी झिम’ या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर उलगडत जातो.

पडदा उघडल्यानंतर दिसतो एका नदीचा घाट, ज्यावर काही स्त्रिया कपडे धूत असताना गप्पा-गोष्टी करत असतात. एक स्त्री तुळशीच्या लग्नाची गोष्ट सांगते आणि या गोष्टीतूनच नाटकाला सुरुवात होते. दारिद्र्यावस्थेतील त्रिवेणी आणि राघोभट या दाम्पत्याचा भिक्षा मागून प्रपंच सुरु असतो. मुलाची इच्छा असलेल्या राघोभटाची पत्नी त्रिवेणी एका मुलीला जन्म देते. तीच नाव तुळशी ठेवण्यात येत. मुलीचा तिरस्कार करत असलेला राघो त्या लहानग्या तुळशीला एका जंगलात नेऊन सोडतो. तिथे एक चेटकीण तुळशीला घाबरवण्याचा प्रयत्न करते. तुळशीला एका म्हातारीचं खोपटं दिसतं. तहान लागली म्हणून तुळशी त्या म्हातारीकडे पाणी पिण्यासाठी जाते .

तिरसट असलेली म्हातारी तुळशीचा राग राग करत असते. भुकेने व्याकुळ झालेल्या लहानग्या तुळशीचा आवाज विठूच्या कानावर पडतो. रखमाचा विरोध डावलून तो तुळशीच्या शोधात म्हातारीच्या खोपट्यापाशी पोहोचतो. तुळशीला पाहताच तिला जवळ बोलावतो आणि स्वतः सोबत घेऊन जातो. एके ठिकाणी तुळशीच्या राहण्याची व्यवस्था करतो. लहानग्या तुळशीला जीव लावतो, खाऊपिऊ घालतो, तिची वेणी फणी करतो, झाडून घेतो, पाणी भरतो. तुळशी मोठी होते. बाप म्हणून तुळशीला जीव लावलेला विठू ती मोठी झाल्यावर नकळतपणे तिच्या प्रेमात पडतो. अनेक वर्षे झाली तरी विठू घरी आला नाही म्हणून रखमा पंढपूरहून विठूला शोधत येते.

विठूला तुळशीच्या घरी पाहून त्याच्यावर अनेक प्रश्नांची सरबराई करते व आपल्यासोबत येण्यासाठी सांगते. मी तुळशीला विचारून येतो तोपर्यंत तू चल पुढे म्हणत विठू रखमाला जायला सांगतो. रखमा जाते व जाताना एक बोका भेट म्हणून तुळशीच्या घरी सोडून जाते. तुळशी विठूला रखमाकडे जायला सांगते. पण तिला एकटीला सोडून जायला विठूचे मन तयार होत नसतं. शेवटी मी पुन्हा येऊन माझ्यासोबत तुला कायमच पंढरपूरला घेऊन जाण्याचं वचन देऊन तुळशी व बोक्याला सोडून निघून जातो.

कालांतरानंतर तुळशीच्या आठवणीत हरवलेल्या विठूचे कशातही मन रमत नसते. हे पाहून रखमा त्याला तुळशीला इकडे आणण्याचे सांगुन तिला भेटायला जायला निघते. जाताना भेट म्हणून फळांची भरलेली करंडी घेऊन जाते. परंतु फळांची करंडी तिच्या घरी पोहोच करण्याअगोदर त्या करंडीमध्ये ती फळांऐवजी साप भरून नेते व तुळशीच्या घरी जाते. घरी गेल्यावर तुळशीला हाका मारते पण तुळशी दार उघडत नसते. आणलेली करंडी बाहेर ठेऊन रखमा निघून जाते. तुळशी करंडी आत घेते व उघडते तर त्यातून विषारी साप बाहेर येतात व बोक्याला दंश करतात, त्यात बोका मरतो.

तुळशी उद्विग्न होते. तुळशीला भेटायला विठू पुन्हा तिच्याकडे येतो. तुळशी त्याच्याशी काहीही बोलत नाही. तो तिला मनवण्याचा हरतऱ्हेने प्रयत्न करतो. तिला बोलत करण्यासाठी लळीताच्या कार्यक्रमाला जायचं सांगून तिच्या आई वडिलांकडे घेऊन जातो. अनेक वर्षे लोटल्यामुळे तिचे आईवडील तिला ओळखत नसतात. शेवटी विठू तिच्या आई वडिलांना ही तुमची मुलगी तुळशी असल्याचे सांगतो. आई वडील त्या दोघांना ही हाकलून देतात.

विठू तुळशीला घेऊन निघून येतो व तिच्याशी लग्न करणार असल्याचं सांगतो.बाप, सखा, मित्र अन प्रियकर झालेला विठू तुळशीला पती म्हणून मान्य नसतो. ती विठूसोबत लग्न नको म्हणून जमिनीत गडप होते. त्याठिकाणी एक झाडं उगवतं. तुळशीच्या विरहात विठू सैरभैर होतो. रखमा त्याला सावरते. व त्याला पंढरपूरला जाऊन भक्तांसाठी विटेवर उभा राहायला सांगते व विठूच्या दर्शनाने नाटक संपते. 

कलाकारांची निवड उत्तम

दिग्दर्शक संजय लोळगे यांनी आशयाच्या मागणीनुसार कलाकारांची निवड करून अर्धी अधिक लढाई जिंकली. सायली वल्लीने रखमाची भूमिका वास्तवदर्शी वठवली. लहान तुळशीची भूमिका रेवती घोटणकरने उत्तम साकारली. भावनिक, प्रेमळ, निरागस तुळशी भाग्यश्री जोशीने ताकदीने पेलली. श्रावणी एडकेने पतीचा आदेश पाळणाऱ्या हतबल त्रिवेणीच्या पात्रास न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. चिन्मयी कुलकर्णी – खताळ हीने स्त्री, आत्या, चेटकीण आणि म्हातारी या चौरंगी भूमिकांचा उचित आब राखला. विठूच्या भूमिकेतील संजय लोळगे यांचा वावर अनुरूप. सचिन शिंगटे यांचा राघोभटाचा अभिनय चांगला होता. इतर स्त्रियांमध्ये अमृता देवढे, समृद्धी खिस्ती आणि अदिती किलोर यांनी रंगत आणली. वसी खानने साकारलेला तरुण आणि छोट्याश्या देवराज गांधीने साकारलेला बोका ठीक. 

भावानुकूल संगीतामुळे नाटक उंचीवर

  सुफी गायक पवन नाईक,अमृता बेडेकर, ऋतुजा पाठक, राधिका परदेशी यांचे पार्श्वगायन व भावानुकूल संगीत आणि साक्षी व्यवहारे यांच्या नृत्य दिग्दर्शनामुळे हे नाटक परिणाम साधण्यास अनुकूल ठरलं. काही प्रसंगात प्रशांत जठार यांची पार्श्व संगीतावरची मेहनत कमी जाणवली. क्षितिज कंठाळे आणि महेश खताळ यांचे नेपथ्य ठीक. पवन पोटे आणि तनिष्का देशमुह यांनी प्रकाशयोजनेत कल्पकता दाखवली. संकेत शहा यांची रंगभूषा उत्तम. संजय लोळगे यांच्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनामुळे नाटकाचे सादरीकरणही तितकेच दमदार झाल्यामुळे मोठ्या रंजकतेने उलगडत गेलेल्या या नाटकाला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

तुळशी नावाच्या एका मुलीमुळे विठू आणि त्याच्या पत्नीमध्ये झालेल्या छोट्या भांडणाभोवती ही कथा फिरते. तुळशीला असहाय्य असल्याने विठ्ठल घरी आणतो, पण रुक्मिणीला हे योग्य वाटत नाही. ती तिच्यावर इतकी नाराज होते की, एका क्षणी ती तिला मारण्याचाही प्रयत्न करते. या कथेत भगवान विठ्ठलाची कोंडी अधोरेखित केली आहे ज्यांना त्यांच्या मानवी रूपात सामान्य जीवनातील समस्यांना सामोरे जावे लागले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please Disable Ad-Blocker