भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन
अकोले, ( प्रतिनिधी)- भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. मागील दीड महिन्यांपासून नाशिक येथील खासगी रुग्णालयात पिचड यांच्यावर उपचार सुरू होते. आज पिचड यांची प्रकृती आणखी खालावली. ब्रेनस्ट्रोक आल्याने पिचड यांना नाशिक येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मधुकर काशिनाथ पिचड (जन्म 1941) हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र सरकार माजी कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी 1980 ते 2009 पर्यंत अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. मार्च 1995 ते जुलै 1999 या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.
2019 मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. त्यांनी 1961 मध्ये अमृतसागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली. ते अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष होते.
प्रारंभिक जीवन
त्यांचा जन्म एक जून 1941 रोजी महादेव कोळी या आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे वडील काशिनाथ पिचड एक शिक्षक होते. त्यांच्या आई कमलाबाई काशिनाथ पिचड या गृहिणी होत्या. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी बीए एलएलबी पूर्ण केले. जिथे त्यांनी विद्यार्थी राजकारणात प्रवेश केला.
भूषवलेली पदे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (I) चे उमेदवार म्हणून 1980 च्या अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. 1985 च्या विधानसभेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून निवडून आले.
1990 च्या विधानसभेच्या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र निवडून आले. 25 जून 1991 रोजी आदिवासी विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून नामांकन झाले. आणि सुधाकरराव नाईक मंत्रालयात 3 नोव्हेंबर 1992 पर्यंत काम केले. 6 मार्च 1993 रोजी आदिवासी विकास मंत्रालय, दुग्धविकास मंत्रालय , विकास मंत्रालय आणि पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयासाठी कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले. शरद पवार सरकारमध्ये 14 मार्च 1995 पर्यंत काम केले.
1995 च्या निवडणुकीत सलग चौथ्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. 27 ऑक्टोबर 1999 रोजी तिसऱ्यांदा आदिवासी विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून नामांकन झाले. 16 जानेवारी 2003 पर्यंत विलासराव देशमुख सरकारमध्ये काम केले. 1999 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून सलग पाचव्यांदा विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. 2004 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सलग सहाव्यांदा विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.
2009 च्या सलग सातव्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. 11 जून 2013 रोजी आदिवासी विकास मंत्रालय, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण मंत्रालयासाठी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकार मध्ये 26 सप्टेंबर 2014 पर्यंत काम केले.