राजकीय

अचानक ७६ लाख मतदान कसं वाढलं?  नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल

मुंबई :(ऑनलाइन न्यूज नेटवर्क) विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार लवकरच स्थापन होईल. सध्या सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. मात्र, असं असतानाच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मतमोजणीसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच या निवडणुकीत मतदारांचा टक्का कसा वाढला? याबाबतही काही नेत्यांनी शंका उपस्थित केल्या आहेत. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे.

निवडणूक आयोगाला काही सवाल करत गंभीर आरोप देखील केले आहेत. “मतदानाच्या टक्केवारीत तफावत असल्याचं दिसत असून याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, तसेच रात्री उशीरापर्यंत कोणत्या मतदान केंद्रावर मतदान सुरु होतं? हे निवडणूक आयोगाने सांगावं? राज्यात किती वाजेपर्यंत मतदान सुरु होतं? याचे फुटेज आम्हाला मिळायला हवे. ७६ लाख मतदानाची वाढ कशी झाली?”, असे अनेक सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केले आहेत.

काय म्हणाले नाना पटोले?
“कोणतीही निवडणूक झाल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन जनतेला माहिती देत असतं. अशा प्रकारची परंपरा आतापर्यंत राहिली आहे. मात्र, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर निवडणूक आयोगाने कोणतीही पत्रकार परिषद घेतली नाही.

महाराष्ट्रात झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत फरक जाणवतो आहे. जवळपास ७६ लाख मतदान वाढलं आहे. मग मतदानाची ही वाढ कशी झाली? आता आम्हाला जे सांगितलं जातं की रात्री साडेअकरा वाजेपर्यंत मतदान झालं. मग कमीत कमी दोन ते तीन किलोमिटरच्या मतदारांच्या रांगा असतील.

मग निवडणुका पारदर्शक घेण्यासाठी निवडणूक आयोग फोटो, व्हिडीओ वैगेरे काढत असतं. मग निवडणूक आयोगाने आम्हाला रात्री मतदारांच्या रांगा लागल्या होत्या की नाही, म्हणजे संध्याकाळपर्यंत मतदानाची आकडेवारी 58.22 टक्के होत असेल तर मग असं काय झालं की रात्री साडेअकरा वाजेपर्यंत मतदान झालं?”, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.

“मतदानाच प्रमाण कसं वाढलं? मतदान जवळपास 7.5 टक्क्यांनी वाढलं. मग याचं उत्तर आम्हाला निवडणूक आयोगाने द्यावं. राज्यात मतदानाचा टक्का जो वाढला आहे त्याबाबत गंभीर प्रश्न लोकांकडून उपस्थित केले जात आहेत. स्वत: केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांचे पती त्यांनी देखील याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. मी जे प्रश्न उपस्थित केले ते त्यांनी देखील उपस्थित केले.

त्यामुळे निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. निवडणूक आयोगाने याचं उत्तर दिलं पाहिजे. तसेच सायंकाळी साडेपाच वाजता मतदान झालेले आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ आम्हाला निवडणूक आयोगाने दिले पाहिजे. हे मतदान कोणत्या केंद्रावर झालं? साडेसात टक्क्यांनी मतदान कसं वाढलं?”, असे प्रश्न नाना पटोले यांनी आयोगाला विचारले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please Disable Ad-Blocker