लेख

पैशाची चर्चा उघडपणे का होत नाही ?

निवडणूक निकाल झाल्यावर अनेक प्रकारची विश्लेषण येतात. त्यात कोणाच्या किती सभा झाल्या ? कोणत्या मुद्द्यामुळे कोण जिंकले ? कोणती घोषणा परिणामकारक ठरली, जातीचे समीकरण कसे होते ? असे विश्लेषण होत राहते.. कोणता फॅक्टर यशस्वी ठरला ? यावर सारे बोलत राहतात

पण पैशाने निवडणुकीत कोण जिंकले व पैसा कमी पडला म्हणून कोण हरले ? या निवडणूक फिरवणाऱ्या घटकावर
सर्वात कमी चर्चा तज्ज्ञ करतात…वास्तविक पैसा हाच अनेकांच्या विजयाचा शिल्पकार असतो. पैशाने अनेक निकाल फिरवले तरीही तज्ज्ञ केवळ जणू मेरिट वर मतदान होते असे गृहीत धरून बोलत राहतात..

पूर्वी पैसा फक्त निवडणूक मतदान होण्याच्या दिवशी वाटला जायचा.शासकीय निधीतूनच आता निवडणूक खर्चाची तरतूद केली जाते. विकास कामांचे बजेट जास्त वाढवले जाते.

त्यासाठी आमदारांना खूप निधी दिला जातो. त्यातून ते वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना कामे देऊन उपकृत करतात. कार्यकर्ते ठेकेदार बनवले जातात. त्यातून 10 टक्के रक्कम आमदारांना मिळते. तोच निवडणूक निधी म्हणून फिरवला जातो. जो 5 कोटी निधी असतो त्याची ही विल्हेवाट अशीच होते.

पूर्वी निवडणूक सुरू झाल्यावर पैसा शेवटच्या दिवशी वाटला जायचा. आता निवडणूक होण्यापूर्वी 6 महिने खर्च सुरू होतो. जवळचे देवस्थान निवडून तेथे सहली सुरू होतात. अगदी अयोध्या दर्शन घडवलेले राजकीय नेते आहेत…वाढदिवस कोजागिरी किंवा कोणतेही निमित्त काढून मोठी कार्यालये घेवून जेवणावळी ,सहली सुरू झाल्या होत्या…
निवडणूक सुरू झाल्यावर तर अनेक हॉटेल फुकट होती. संध्याकाळी अनेक तरुणांना साधे बोलता येत नाही की चालता येत नाही. इतकी दारू मोफत दिली जाते. कोणत्याही गावातील 7/8 तरुणांनी जायचे, गाव आमच्या मागे आहे हे भासवायचे आणि प्रचाराला गाडी घेवून यायचे अशी स्थिती होती… या निवडणुकीत मोठ्या संख्येने नवीन तरुण दारू प्यायला शिकले हे दुर्दैव आहे. निवडणूक म्हणजे अल्पवयीन तरुणांना दारू प्यायला शिकवणारी प्रशिक्षण केंद्र झाली आहेत….
या निवडणुकीत एका मताचे आकडे एक हजारापासून दहा हजारांपर्यंत आहेत आणि दोन्ही उमेदवारांचे पैसे घेणारे लोक आहेत

पैसे घेतात म्हणून आपण गरिबांना वर्षानुवर्षे बदनाम करतो आहोत. पण शहरी कॉलनी बिल्डिंग त्यात कोठेही मागे नाही फरक फक्त इतकाच की त्यांचा प्रकार अधिक प्रगत आहे…ते बिल्डिंग ला रंग देणे, क्रीडा साहित्य जिम मागणे, वर्षाचे केबल बिल भरणे असे ठोक व्यवहार करतात…शिक्षक आमदार निवडणुकीत पैठणी, नथ, आणि पाकीट स्वीकारून शिक्षकांनी नैतिक प्रतिमेला धक्का दिलाच होता..त्यामुळे आता पैसे घेणारे म्हणजे गरीब असे समीकरण राहिले नाही…

निवडणुकीचे बूथ लावणाऱ्या कार्यकर्त्यांना पूर्वी दिवसभर नाश्ता करण्यासाठी पैसे दिले जात..इतके ते स्वस्त होते. आता कोणता उमेदवार बूथ साठी किती रक्कम देतो यावरून त्याचा स्तर कळतो…त्या रकमा काही हजार ते लाखात गेल्यात…
अपक्षानी माघार घेणे, सरपंच, सदस्य यांच्याशी होणाऱ्या अर्थपूर्ण चर्चा तर लाखात होतात…

उमेदवार तर भ्रष्ट आहेत..पैसे वाटतात पण मतदारांची मानसिकता ही भ्रष्ट आहे आणि कार्यकर्ते नेता कमावतो तर मग त्याच्याकडून रक्कम काढली तर कुठे बिघडले ? अशा व्यावहारिक मानसिकतेत आहेत…

हा पैसा जिंकतो आणि पैसा हरतो… टक्केवारीत पैसा कमावला जातो, निवडणुकीत उधळला जातो आणि तज्ज्ञ केवळ किती टक्के मते कोणाची वाढली कोणत्या मुद्द्याने वाढली याची चर्चा करत राहतात…

                                     हेरंब कुलकर्णी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please Disable Ad-Blocker