आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांच्या दप्तर तपासणीचे आदेश

नगर (प्रतिनिधी): शहराच्या मध्यवर्ती भागातील शाळेत एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याचा खून केल्याच्या धक्कादायक प्रकरणानंतर आता माध्यमिक शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. नूतन शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांना आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांचे दप्तर तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करून त्यांची गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न आम्ही करू, असेही आश्वासन शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी दिले. याशिवाय, शासनाच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये नव्याने चार समित्या स्थापन करून त्या कार्यरत केल्या जाणार आहेत. या समित्यांच्या माध्यमातून शाळांमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करण्यास मदत होणार आहे.
दोन दिवसांपूर्वी शहरातील एका शाळेच्या परिसरात विद्यार्थ्याच्या खूनाची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर बोलताना गायकवाड म्हणाल्या की, “प्रत्येक शाळेने एका शिक्षकाची समुपदेशनासाठी जबाबदारी निश्चित करावी आणि दर आठवड्याला विद्यार्थ्यांचे दप्तर तपासावे. यातून विद्यार्थ्यांच्या वागणुकीमध्ये सकारात्मक बदल घडेल.”
संध्या गायकवाड यांची माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. त्यांच्या स्वागतासाठी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तसेच राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, “फक्त मागण्या न करता विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या अपेक्षेनुसार शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
या प्रसंगी मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी शीतल बांगर, संभाजी पवार, उल्हास दुगड, काशिनाथ हापसे, श्रीकृष्ण पवार, संगीता जोशी, संगीता गुंड, श्रीमती नन्नवरे, प्रसाद सामलेटी, सचिन गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.