वडगाव गुप्ता येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर – 254 रुग्णांची तपासणी

वडगाव गुप्ता (रियाज पठाण) नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथे मंगळवारी, दिनांक २४ जून रोजी स्वाभिमानी सोशल फाउंडेशन, श्री हनुमान सेवा भक्त मंडळ आणि वरद नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी वरद नेत्रालयाचे नेत्रतज्ञ डॉ. रावसाहेब बोरुडे आणि डॉ. स्मिता पटारे यांचा स्वाभिमानी सोशल फाउंडेशन आणि हनुमान सेवा भक्त मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.
या शिबिरात कंप्युटराईज्ड नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये 254 रुग्णांनी सहभाग घेतला. त्यातील अनेकांना मोतीबिंदू, काचबिंदू तसेच इतर नेत्रविकार असल्याचे निदर्शनास आले. अशा रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांनी योग्य मार्गदर्शन केले.

शिबिरात उपस्थित रुग्णांना केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पुढील उपचार आणि शस्त्रक्रियांची माहिती देण्यात आली. या योजनांद्वारे रेटिनाशी संबंधित शस्त्रक्रिया, इंजेक्शन, लेझर, तिरळेपणा, काचबिंदू तसेच नेत्ररोपण अशा सेवा मोफत मिळणार आहेत.
या उपक्रमाला श्री श्यामराव पिंपळे, श्री बाबासाहेब डोंगरे, श्री जालिंदर पाटील डोंगरे, गणेश आबासाहेब डोंगरे, गोरक शेवाळे, हौसराव ढोबळे, नाना शेवाळे, सुजित डोंगरे, भाऊ शेवाळे, नानासाहेब डोंगरे, सखाराम शिंदे, विठ्ठल डोंगरे, शेवाळे सर, उमेश डोंगरे, अंकुश नवले, भाऊ जरे, दिलीप सातपुते, संजय ढेपे, नामदेव शेवाळे, नंदू शेवाळे (पोलीस पाटील), पवार सर, किसन गीते, नामदेव गव्हाणे, विठ्ठल डोंगरे यांसह वडगाव गुप्ता व पंचक्रोशीतील अनेक शेतकरी, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल सर्वांनी डॉक्टरांचे, आयोजक संस्थांचे आणि उपस्थित स्वयंसेवकांचे आभार मानले. अशा उपक्रमांद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा सहजपणे उपलब्ध होत असल्याचे समाधान उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केले.