उद्योगांना चालना देण्यासाठी जिल्ह्यात जागरूकता कार्यक्रम
खा. नीलेश लंके यांनी घेतली मंत्री जतीन राम मांझी यांची भेट
नगर,(प्रतिनिधी )- नगर जिल्ह्यात उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच नव उद्योजक घडविण्यासाठी तालुकानिहाय जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. खा. नीलेश लंके यांनी सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री जतीन राम मांझी यांची बुधवारी भेट घेतल्यानंतर हा कार्यक्रम घेण्याचे मंत्री मांझी यांनी मान्य केले. जिल्ह्यात नव्या उद्योगांना चालना, नवउद्योजक घडविण्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे या हेतूने खा. नीलेश लंके यांनी मंत्री मांझी यांची भेट घेउन चर्चा केली.
नगर जिल्हयात नवे उद्योग उभारणीसाठी मोठी संधी असून सुपा-पारनेर ही औद्योगिक वसाहत झपाटयाने विकसीत होत आहे. या वसाहतीमध्ये अनेक परदेशी कंपन्यांनी आपले उद्योग सुरू केले असून राज्यातील मोठया औद्योगिक वसाहतीकडे या वसाहतीची वाटचाल सुरू आहे. या वसाहतीसह जिल्ह्यातील उद्योजकांना उद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने खा. लंके यांनी पुढाकार घेत मंत्री मांझी यांची भेट घेत सविस्तर माहीती दिली.
खा. लंके यांनी दिलेल्या माहीतीवर प्रभावीत होत मंत्री मांझी यांनी नगर जिल्हयात जागरूकता कार्यक्रम घेण्यास मान्यता दिली. नगर जिल्ह्यातील उद्योगाची रूपरेषा ठरविण्यासंदर्भात तसेच सुक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयांतर्गत असणा-या योजना लवकरच प्रथम प्रत्येक तालुक्यात व त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी जागरूकता कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
आर्थिक सहाय्यासाठी मार्गदर्शन सुक्ष्म, लघु व मध्यम मंत्रालयाअंतर्गत उद्योजक वाढीसाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात येईल. तात्काळ उदयम आधार रजिष्ट्रेशन असलेल्या उद्योजकांना आर्थिक सहायय देण्याकरीता योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे.