राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांवर काव्यात्मक प्रकाशझोत..
सस्नेह नमस्कार
नगर केंद्रावरील 63 वी राज्य नाट्य स्पर्धा मोठया उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत एकूण 17 संघांनी सहभाग घेतला होता, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव यातील 3 नाटके कॅन्सल झाली. सादर झालेल्या नाटकांनी अनेक वेगवेगळे विषय या स्पर्धेतून हाताळले. काही नाटके सुमार दर्जाची झाली, तर काही नाटकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. मुळातच आपण नाटकाला प्रयोग म्हणतो, त्यामुळे प्रत्येकवेळी त्या प्रयोगात नावीन्य असतं.
जी नाटकं मी पाहिली, त्या नाटकांचं मी “लोकनेशन न्युज” व ‘दैनिक नवराष्ट्र’मध्ये समीक्षण लिहीलं. ज्या संघाला समीक्षण आवडलं त्यांनी प्रचंड कौतुक केलं. पण ज्यांना आवडलं नाही, त्यांनी तूला काय कळतं…? म्हणत हमरी-तुमरीवर ही आले. मुळात समीक्षण लिहिताना कोणताही दुजाभाव समीक्षकाच्या मनात नसतो. तो त्या कलाकृतीकडे फक्त सादरीकरण म्हणूनच पाहत असतो. या नगर केंद्रावरील 63 व्या राज्य नाट्य स्पर्धेतील 17 नाटकांवर मी खालील रचनेतुन टाकलेला प्रकाशझोत..
जन पळभर म्हणतील टिंब टिंब ने उघडला,
राज्य नाट्य स्पर्धेचा पडदा !
हास्यविनोदात रंगले प्रेक्षक पाहुनी,
तो, तिचा दादला आणि मधला !!
दिग्दर्शक कृष्णा वाळके,
अन लेखक श्याम मनोहर !
जगण्यातला आनंद शोधणारं नाटक केले,
प्रियांका आणि दोन चोर !!
तयारी होती जंगी,
अन विषयही होता राईट !
पण अचानकच कॅन्सल झाले,
नाटक ब्लॅक अँण्ड व्हाईट !!
शहरी कलाकारांच्या तुलनेत,
ग्रामीण कलाकारही होते तोडीस तोड !
जेव्हा पाहिलं प्रेक्षकांनी,
कोपरगावचे कधी आंबट कधी गोड !!
चंदेरी दुनियेचं स्वप्नं पाहणाऱ्या तरुणाईचा,
घेतला अचूक वेध !
जेव्हा ‘सप्तरंग’ने सादर केले,
डॉ. धामणे सरांचे पंचमवेद !!
मंचावर अवतरले जेव्हा,
शाहू-फुले-आंबेडकर !
राजर्षी पाहून प्रेक्षकांनी केला,
टाळ्यांचा गजर !!
घोडेगावकरांनी साकारला,
जेव्हा दुसरा अंक !
संवेदनशील कलाकारांचा तेव्हा,
दाटून आला कंठ !!
‘रियाज पठाण’च्या नाटकात होते,
धर्म अन कर्म !
मन झालं तृप्त पाहुनी,
‘रवींद्र काळे’ सरांच मर्म
‘फिरोज काझी’ करणार होते’
‘इरफान मुजावरां’चं उत्खनन !
पण नाटकचं झालं कॅन्सल,
म्हणून प्रेक्षक ही नाराजले मनोमन !!
जातिव्यवस्थेवर भाष्य करणारं,
‘विजय तेंडुलकरां’चं कन्यादान !
‘नाट्य आराधना’च्या कलावंतांना दिला,
प्रेक्षकांनी टाळ्यांचा सन्मान !!
‘नाट्य मल्हार’ने घातला दंडवत,
जेव्हा नाटक जाहले सुरु !
प्रेक्षक झाले लोटपोट,
पाहून आता कसं करू…?
‘राहुरी’करांनी साकारले जेव्हा,
‘प्रशांत सुर्यवंशी’चे रिप्लेसमेंट !
नवख्या कलाकारांच्या अभिनयाला,
रसिकांनी दाद दिली थेट !! नाटक कॅन्सल करताना !!
बस्स…. इतकंच ने दाखवली,
घरा-घरातली कथा !
अमाशी ने मांडली,
जोगतीनीची व्यथा !!
भावभक्तीत रंगले प्रेक्षक,
झिम पोरी झिम पाहताना !
आकाशदिठी ने हिरमोड केला,
शब्दांकन
-अविनाश कराळे