वृद्धांची कैफियत मांडणारे : बस्स इतकंच…
संथ सादरीकरणामुळे रेंगाळलेला प्रयोग, काही भावनिक प्रसंगानी प्रेक्षक अंतर्मुख
नाट्य समीक्षण
अविनाश कराळे
जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर खऱ्या आधाराची गरज असताना निराधार होऊन एकटं पडल्यानंतर घरातील ज्येष्ठांची होणारी घुसमट, स्वतःच्याच मुलांकडून होणारी अवहेलना नात्यात अनेक पेच निर्माण करते. या पेचातून अनेकदा मनावर खोल जखमा होतात. हे घाव जितक्या मूकपणे सोसले जातात, तितकीच जखम गहिरी होते. कोणाच्याही घरात घडू शकणारी गोष्ट श्रीरामपूर येथील कर्णेज अकॅडमीने मंगळवार, दि. १० डिसें. रोजी सादर केलेल्या डॉ. दिनेश कदम लिखित व प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर व डॉ. वैशाली भुजबळ दिग्दर्शीत ‘बस्स इतकंच…’ या नाटकातून मांडली.
वृद्धत्व अन आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेल्या माईच्या तारुण्यावस्थेतील स्वगताने नाटकाचा पडदा उघडतो . अण्णा व माई हे वृद्ध दांपत्य. त्यांना दिनू व श्याम हे दोन मुलं. मोठा मुलगा दिनू व त्याची पत्नी मनीषा हे अण्णांनी सुरू केलेल्या किराणा दुकानातून आपला उदरनिर्वाह चालवितात तर लहान मुलगा श्याम हा कामानिमित्ताने पत्नी रेवती सोबत पुण्यात राहतो. मनीषाकडून आई-वडिलांच्या खाण्यापिण्याचे हाल होत असल्याचे दिनूला समजते. दिनू मुलाच्या अभ्यासासाठी जागा लागेल म्हणून पत्नीच्या सांगण्यावरून निरुपयोगी वाटत असलेल्या अण्णा – माईची रवानगी दुसऱ्या ठिकाणी करतो. तिथे त्यांना सदाशिव नावाचा अनाथ मुलगा भेटतो, जो अण्णा व माईची विनामोबदला सेवा करतो. अण्णांच्या नावे असलेली गावाकडील शेती विकल्यास त्यातून बक्कळ पैसे मिळतील म्हणून दिनू त्यांना ती जमीन आपल्या नावावर करण्याची अथवा विकून टाकण्याबाबत सांगतो. जमीन विकण्यास माई विरोध करते. त्यामुळे दिनू व मनीषा अण्णा-माईशी सर्व संबंध संपवून निघून जातात. आजारपणामुळे वैतागलेली माई देवाकडे इच्छामरण मागत असते. एक दिवस अण्णा माईचे हाल पाहवत नाही म्हणून स्वतःच तिला संपवुन कायमची मुक्ती देतात व कोर्टाला केलेल्या गुन्ह्याची कबुली देऊन स्वतः शिक्षा करण्याची विनंती करतात. गावाकडे आपल्या नावावर असलेली ४ एकर शेती शासनाने ताब्यात घेऊन त्याठिकाणी आपल्या पत्नीच्या नावाने मुलींसाठी शाळा सुरू करण्याची इच्छा बोलवून दाखवतात आणि पडदा पडतो. नवनाथ कर्डीले व प्रकाश ढोणे (प्रकाश योजना), मयूर वाकचौरे व किरण उबाळे (संगीत), प्रा. अशोक कर्णे व संदीप कदम (नेपथ्य), सुनीता कर्णे (रंगभूषा), आर्वी व्ही. आर व सौरभ संकपाळ (वेशभूषा) या घटकांनी तांत्रिक बाजू सांभाळल्या.
दिग्दर्शनावर मेहनत आवश्यक -
आशय चांगला असला तरी त्या तोडीचं सादरीकरण न झाल्याने प्रयोगात शिथिलता जाणवली. अनेक प्रसंग रेंगाळल्याचं ही जाणवत होतं. अण्णा ही प्रमुख भूमिका प्रा. अशोक कर्णे यांनी उत्तम साकारली. त्यांच्या संवादांना प्रेक्षकांनी अनेकदा दाद दिली. आकांक्षा गर्जे यांची माई, दिनू साकारलेला गणेश करडे आणि सदाशिव साकारलेला अक्षय खंडागळे यांचा प्रयत्न उत्तम होता. काजोल गायकवाड यांनी मनीषा ह्या पात्राचे कायिक हावभाव उत्तम होते, परंतु त्या तुलनेत त्यांनी वाचिक अभिनयावर मेहनत घेणे आवश्यक होते.