‘आता कसं करू..?’ म्हणत प्रेक्षकांनी घातला ‘संदीप’ ला दंडवत !
हास्यरसात ओतप्रोत होत प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालणारा ‘नाट्य मल्हार’चा यशस्वी प्रयत्न
नाट्य समीक्षण
अविनाश कराळे
63 वी राज्य नाट्य स्पर्धा रंगात आली आहे . प्रेक्षकांना हसवून त्यांचे आयुष्य वाढवणारं अन रंगमच गाजवणारं विनोदी नाटक म्हणजे ‘आता कसं करू?’. या नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेत चार चांद लावले. काळानुसार नाट्यरसिकांच्या आवडीनिवडींमध्ये बदल झालेले दिसून येत आहेत. याचाच अंदाज घेऊन संदीप दंडवते लिखित अन दिग्दर्शित श्रद्धा -अंधश्रद्धा, बुवाबाजी, लग्नाळू मुलांचा प्रश्न या सामाजिक विषयांवर भाष्य करणारं ‘आता कसं करू?’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत (रवि. 8 डिसें. रोजी) सादर झाले.
पडदा उघडताच दिसते भिंतीवर जागोजागी लटकलेले देवदेवतांचे अनेक फोटो आणि देवघर असणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबाचे घर. नंदन हे नाटकातील मध्यवर्ती पात्र. त्याची आई अतिशय देवभोळी. तिच्या देवभोळेपणाला वैतागलेल्या नंदन आणि त्याच्या वडिलांमध्ये तिला विरोध करण्याची हिंमत नसते. नंदन हा दैवी अवतार असून तो महान तपस्वी होईल, या आशेने लग्नाचे वय झाले तरी तिच्या मनात नंदनच्या लग्नाचा विचार नसतो. परंतु लग्न करण्याची प्रचंड इच्छा असलेला नंदन आईला याबाबत तयार करण्यासाठी वडिलांना गळ घालतो. आईसमोर वडीलांचे काहीच चालत नसल्याने ते यास टाळाटाळ करतात. नंदन हा बाॅबीच्या मदतीने एक प्लॅन बनवतो आणि तो प्लॅन यशस्वी झाल्यानंतर वडील आईला नंदनच्या लग्नासाठी तयार करतात.
आईच्या अपेक्षेनुसार देवदेव करणाऱ्या अनिता या मुलीशी नंदनचे लग्न होते. पुढे 20 दिवस पूजेचा मुहूर्त नसल्याने पूजा होईपर्यंत नंदनने अनिताला स्पर्श ही करू नये, असा सल्ला गुरुजी देतात. पण नंदनला हे मान्य नसते. नवदांपत्याला एकमेकांपासून दूर ठेवण्यासाठी आई तांदूळ या तिच्या भाच्याला बोलावून घेते. यातून मार्ग काढण्यासाठी नंदन पुन्हा पुन्हा बॉबीच्या मदतीने प्लॅन बनवतो. देवी अंगात आल्याचे सांगून दोघेच देवदर्शनाच्या बहाण्याने घराबाहेर पडतात व लॉजवर थांबतात. ते घरी परततात तेव्हा घरी दरबार भरलेला असतो. अनेक भक्तमंडळी नंदनडे त्यांच्या अडी-अडचणी घेऊन येतात. दिव्यपुरुष असल्याचे समजून अनिता नंदनला स्पर्शही करू देत नसल्याने नंदन वैतागलेला असतो. निमिशा नावाची तरुणी एक दिवस नंदनच्या घरी सेवा करण्यासाठी येते. आई आणि पत्नीला अद्दल घडविण्यासाठी नंदन दोघींचा विरोधाला न जुमानता तिला सेवेसाठी घरी थांबवतो. बॉबी आणि नंदन निमिषाशी सूत जुळवून देण्याचे आमिष दाखवून तांदुळला त्यांच्या प्लॅनमध्ये सामील करून घेतात.
नंदन मुद्दामच निमिशा सोबत लगट करत असल्याने आई आणि अनिताची तगमग होत असते. शेवटी वैतागून नंदन आईला हे सर्व काही नाटक असल्याचे सांगतो. आई आणि अनिताला त्यांची चूक उमगते. दरम्यान निमिशा ही पत्रकार असून नंदनचा पर्दाफाश करण्यासाठी आल्याचे सांगताच सर्वांना धक्का बसतो. नंदनने स्वतःच आपली चूक कबूल केल्याने काहीही करणार नसल्याचे निमिष सांगते. शेवटी नंदन आणि अनिताला सर्वानुमते एकांत मिळतो व नाटकाचा पडदा पडतो.
सर्वच कलाकारांचा उत्तम मेळ
आईचा आज्ञाधारक नंदन पार पाडतानाच तारुण्याचा उंबरठा पार करण्याची तगमग असलेला नंदन अथर्व धर्माधिकारीने उत्तम साकारला. वडिलांची भूमिका राहूल सुराणाने आपल्या विनोदी शैलीतून समजून उमजून केली. श्वेता पारखेने कायिक अन वाचिक अभिनयातुन देवभोळ्या आईच्या पात्रात जिवंतपणा आणला. पवन पोटेच्या बॉबीने चांगलीच रंगत आणली. तांदूळ रंगमंचावर येतो तेव्हा भाव खाऊन जातो. निरागस चेहऱ्याचा तांदूळ साकारताना प्रदीप वाळकेने प्रेक्षकांना मनमुराद हसवले. शांत, सोज्वळ अन सुशील अनिता अंतरा वाडेकरने लीलया पेलली. सौंदर्या भोजने साकारलेली निमिशा उत्तम. प्रकाश योजना (ऋतुराज दंडवते), संगीत (आशुतोष निमसे), नेपथ्य (अंजना मोरे, प्रमोद जगताप), रंगभूषा (रितेश डेंगळे), वेशभूषा (गौरी देशपांडे), रंगमंच व्यवस्था (समर्थ जोशी, संकेत आभाने) या घटकांनी नाटकात रंगत आणली.
दिग्दर्शकाचा यशस्वी प्रयत्न
नाटक मनोरंजक असल्याने नाटकात ठिकठिकाणी विनोद पेरला आहे, त्यामुळे नाटक प्रेक्षकांना हसवण्यात यशस्वी होतंय. एखादा सीन थोडा ओढत नेलाय अस वाटतानाच एखादी पंचलाईन भाव खाऊन जाते. कलाकारांचा रंगभूमीवर बराच वावर आहे पण नेपथ्य आणि दिग्दर्शन अचूक असल्याने कुठेही गोंधळ वाटत नाही. नाटकाची भावना आणि गरजेप्रमाणे साजेशी गाणी गायली व निवडली आहेत. गंभीर विषयवार अलगद अन खट्याळपणे भाष्य करणाऱ्या या नाटकाने प्रेक्षकांना मनापासून हसवत थोडासा विचार करायला लावण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.