‘सागर’ बंगल्यावर फडणवीस-अदानींमध्ये दीड तास खलबतं, चर्चांना उधाण
प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर दोघांमधील ही पहिली भेट ठरली आहे. मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल अदानी यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्यासाठी ही भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस आणि गौतम अदानी यांच्यात जवळपास दीड तास चर्चा झाली.
राज्यात अदानी यांचे अनेक महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत. धारावी पुनर्विकासाचा प्रकल्पदेखील अदानी समूहाकडे आहे. गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आपले व्यवसाय साम्राज्य शून्यातून उभे केले आहे. 2023 मधील हिंडेनबर्ग अहवालासारखे धक्के बसल्यावर त्यांना केवळ सात दिवसांत 29 हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले. त्यामुळे त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये लक्षणीय घट झाली होती.
नोव्हेंबर 2024 मधील आकडेवारीनुसार, 60 अब्ज डॉलर संपत्तीसह अदानी आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे, तर जगातील 25 व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.