फसलेल्या प्रयोगाने गंभीर विषयाचेही झाले विनोदी सादरीकरण
नाट्य समीक्षण
अविनाश कराळे
प्रत्येक कथानकाचा एक ठराविक आत्मा आणि आवाका असतो. त्यानुसार त्याचे नाटक होत असते. मात्र विषयाची ओढताण करून तिचा आवाका वाढविण्याचा प्रयत्न केल्यास तो प्रयोग फसतो. असेच काहीसे ‘रिप्लेसमेंट’ या नाटकाचे झाले. नाटकाचा ‘न’ ही माहिती नसलेल्या नवख्या कलाकारांना सोबत घेऊन थेट राज्य नाट्य स्पर्धेमध्ये नाटक सादर करण्याचा धाडसी प्रयत्न केल्याबद्दल खरंतर लेखक-दिग्दर्शक प्रशांत सूर्यवंशी यांचे कौतुकच.. पण संघाच्या कॅप्टनचा निर्णय चुकला, तर त्याचे परिणाम पूर्ण संघाला भोगावे लागतात, आणि ‘रिप्लेसमेंट’ चे ही तसेच झाले. पाठांतराचा अभाव, संवादांची अनावश्यक पुनरावृत्ती, संथ सादरीकरण, पात्रांची चुकलेली निवड यामुळे ‘रिप्लेसमेंट’ चा प्रयोग रंगला नाही.
स्व-लिखित संहिता सादर करताना संहितेचा आवाका ओळखता न आल्याने, वेळेचे नियोजन करताना लेखक-दिग्दर्शक व प्रमुख भूमिका साकारलेल्या प्रशांत सूर्यवंशी यांची तारांबळ उडालेली दिसते. आडात नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार, या न्यायाने उदंड आत्मविश्वास असतानाही संहितेचा अभ्यास करताना लेखक फसला, आणि एक अपेक्षाभंग करणारा प्रशांत सूर्यवंशी लिखित व दिग्दर्शित ‘रिप्लेसमेंट’ हा नाट्यप्रयोग राज्य नाट्य स्पर्धेत नटेश्वर कला व क्रिडा मंडळ श्री शिवाजी नगर, ता. राहुरी यांनी सादर केला
सेवानिवृत्त असलेले साहेब आणि शाळेत मुख्याध्यापिका असलेल्या मॅडम हे वृद्ध दाम्पत्य. त्यांचा डॉक्टर असलेला मुलगा गौतम परदेशात गेलेला असतो. त्याची पत्नी शुभांगी हिचे निधन झालेले असते. गौतम आणि शुभांगीची मुलगी विभा ही आजी-आजोबासोबत राहत असते. एके दिवशी अचानक कल्पना नावाची एक अनोळखी स्त्री घरात येते व मीच गौतमची पत्नी असल्याचे सांगते. साहेब व मॅडम पोलिसांना फोन करून कल्पनाबाबत तक्रार देतात. इन्स्पेटर घरी येऊन ह्या प्रकरणाचा छडा लावण्याचे आश्वासन देतात.
कल्पना घरी आल्यापासून विभाला आपलंस करते. तिच्या वागण्या-बोलण्यातून ती शुभांगीच असल्याचे सर्वांना जाणवते. परंतु स्वतः परदेशात गेल्यानंतर शुभांगीची रिप्लेसमेंट म्हणून गौतमनेच कल्पनाला पाठवले असेल असे आई-वडिलांना वाटते. सुगंधा काकू ह्या शेजारी राहणाऱ्या स्त्रीचे यांच्या घरी ये-जा असते. एक दिवस डॉ. गौतमची क्लासमेट डॉ. मैथिली घरी येते व कल्पनाशी संवाद साधते. डॉ. गौतम परदेशातून आल्यानंतर आई-वडील त्याला कल्पनाबद्दल विचारतात. आपल्याला याबद्दल ही काहीही माहिती नसल्याचे तो सांगतो. शेवटी आई-वडील त्याला कल्पनाबद्दलची खरी माहिती काढण्याबद्दल सांगतात. गौतम कल्पनाशी चर्चा करतो.
एकदिवस आत्महत्या करण्यासाठी जात असताना एक बॅग सापडल्याचे कल्पना गौतमला सांगते. ती सापडलेली बॅग घेऊन ती घरी येते. त्या बॅगेत तीला एक डायरी सापडते. शुभांगीला दैनंदिनी लिहिण्याची सवय असल्याने त्या डायरीवरून कल्पनाला शुभांगीच्या व्यक्तिमत्वाबद्दल समजते. त्याआधारे ती घरात प्रवेश करून आपण शुभांगीच असल्याचा प्रथमदर्शनी दावा करते व शेवटी आपण शुभांगी नसून कल्पना असल्याचे गौतमला सांगते. सरतेशेवटी आई-वडिलांच्या आग्रहावरून गौतम कल्पनाला स्वीकारतो आणि पडदा पडतो.
कल्पना साकारलेल्या प्राची बधे हिने सुरवातीपासूनच आपली भूमिकेवरची पकड घट्ट ठेवली. शुभांगी त्रिभुवन हिने साकारलेली मॅडम आणि अनुष्का कोरडे हिने साकारलेली सुगंधा काकू यांनी पात्रात रंगत आणली. डॉ. मैथिली साकारलेल्या पूजा कुमावत हीचा अभिनय त्या तुलनेत कुठेच जाणवला नाही. संवाद विसरल्यानंतर तोच संवाद दोन-तीन वेळेस तिने रिपीट केल्याने प्रेक्षकात हशा पिकला.
डॉ. गौतमच्या भूमिकेतील सचिन पाटोळे आणि इन्स्पेक्टरच्या भूमिकेतील आनंद कांबळे हे दडपणाखाली रंगमंचावर वावरत असल्याचे अनेकदा जाणवत होते. इन्स्पेक्टरचा चेहरा बऱ्याच प्रसंगात दिसतच नव्हता. संपूर्ण नाटकात लक्षात राहिली ती लहानगी विभा साकारलेली भैरवी केळकर. रंगमंचावर आत्मविश्वासाने अन मुक्तपणे वावरत तिने नाटकाला उंची प्राप्त करून दिली. लेखन-दिग्दर्शनासोबत प्रमुख साहेबांची भूमिका साकारणारे प्रशांत सूर्यवंशी हे नाटकाच्या सर्वच घटकांकडे लक्ष ठेवण्याच्या नादात आपलीच भूमिका हरवून बसले.
संजय वाणी (प्रकाश योजना), दत्तात्रय साळवे (नेपथ्य), सई सूर्यवंशी (पार्श्वसंगीत), विशाल तागड (रंगभूषा), विजय साळवे (वेशभूषा) व सविता खळेकर (रंगमंच व्यवस्था) यांनी तांत्रिक जबाबदाऱ्या पार पाडल्या.
नवख्या कलाकारांना घेऊन कमकुवत संहितेमुळे प्रयोग रंगला नसला तरी, वैयक्तिक पातळीवर चांगले सादरीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नटेश्वर कला व क्रिडा मंडळाच्या कलावंत व तंत्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन!