तेंडुलकरांच्या जातीव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या ‘कन्यादान’ ने प्रेक्षक विचारात
नाट्य समीक्षण
अविनाश कराळे
जातीव्यवस्थेचं वास्तव भारतीय समाजात शेकडो वर्षांपासून आहे. औद्योगिकीकरण, यंत्रसंस्कृती, आधुनिक शिक्षण, नागरीकरण वगैरेंमुळे जाती-जातींतील भिंती पडतील अशी जी अपेक्षा होती, ती मात्र पूर्ण झालेली नाही. अश्याच कालातीत वर्गसंघर्ष, जातसंघर्ष आणि संस्कृतीसंघर्षांवर भाष्य करणार विजय तेंडुलकर लिखित, अनंत जोशी दिग्दर्शित ‘कन्यादान’ हे नाटक नाट्य आराधना या संस्थेनं राज्य नाट्य स्पर्धेत सादर केल.
नाथ देवळालीकर हा आमदार अन समाजवादी चळवळीतील नेता. त्यांनी समविचारी व समाजवादी चळवळीत सक्रिय असलेल्या सेवा देवळालीकर या मुलीशी प्रेमविवाह केलेला. त्यांना पंचवीशीत असलेला व एमएससी करत असलेला मुलगा जयप्रकाश व सुशिक्षित पण नोकरी करत नसलेली ज्योती ही मुलगी आहे. देवळालीकर कुटुंबावर समाजवादी विचारांचे खोल संस्कार आहेत. जेव्हा ज्योती सांगते की, ती अरुण आठवले या दलित मुलाच्या प्रेमात असून ते लवकरच लग्न करणार आहेत, तेव्हा या उच्चवर्णीय, मध्यमवर्गीय घरातील खेळीमेळीचं वातावरण बिघडतं. यावर देवळालीकर कुटुंबातील व्यक्ती वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात. तिची आई सेवा देवळालीकर एक समाजसेविका आहे.
समाजवादी चळवळीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या व्यक्तीऐवजी एक आई म्हणून ती ज्योतीला, मुलगा किती शिकला आहे, नोकरी करतो का, राहतो कोठे, घरी कोण कोण असतं वगैरे पारंपरिक प्रश्नांची सरबत्ती करते. यातील निम्म्या प्रश्नांची उत्तरं ज्योतीकडे नसतात. ती सांगते की, मी फक्त त्याच्या लेखनावर व कवितांवर भाळले. ज्योतीची निवड बघून नाथ देवळालीकर मात्र विलक्षण खूश होतात.
या लग्नात त्यांना खऱ्या सामाजिक क्रांतीची सुरुवात दिसते. आपल्या पिढीनं जे फक्त बोलून दाखवलं, ती सामाजिक क्रांती माझ्या संस्कारात वाढलेली माझी मुलगी करून दाखवत आहे; म्हणून ते आनंदाने या लग्नाला पाठिंबा देतात. अरुण जेव्हा देवळालीकरांच्या घरी येतो, तेव्हा घरी फक्त ज्योतीच असते. या प्रसंगापासून नाटक पकड घ्यायला लागतं. अरुण येतो, तोच प्रचंड मानसिक ताण व निरनिराळे गंड घेऊन. तो प्रत्येक क्षणी निरनिराळ्या प्रकारे वागतो. कधी एकदम विचारी, तर कधी अविचारी. कधी ग्राम्य भाषा, तर कधी नागर. देवळालीकर सारख्या ब्राह्मण कुटुंबाला यापैकी कशाचीच सवय नसते.
त्यांच्या भावविश्वात होणारा जावई घरी आल्यावर काय घडेल याचं स्पष्ट चित्र असतं. अरुण आठवले या चित्रांतील एकही भाग पूर्ण करत नाही. त्यांची ही पहिलीच भेट वादळी ठरते आणि आगामी भेटी कशा प्रकारच्या असतील याचा प्रेक्षकांना अंदाज येतो. अरुण-ज्योतीचं लग्न झाल्यानंतर सुरू होते ज्योती व देवळालीकर कुटुंबाची अभूतपूर्व ससेहोलपट. अरुण तिला अनेकदा अमानुष मारहाण करतो. त्याच्याकडे अनेकदा पैसे नसतात, तो मित्रांकडून हात उसने पैसे घेऊन मद्यपान करतो. त्या नशेत स्वत:चं वैफल्य ज्योतीला मारहाण करून काढतो. ज्योती जिवंतपणी नरकयातना भोगत असते. हे सर्व तिचे उदारमतवादी आई-वडील हतबुद्धपणे बघत असतात. त्यांच्या लग्नाला सुरुवातीला पाठिंबा देणारे नाथ देवळालीकरही नंतर अरुणची निर्भर्त्सना करतात. दुसरा अंकात अरुणचं आत्मचरित्र प्रकाशित झालेलं असतं. त्याच्या पुस्तकाच सर्वत्र कौतुक होत असते. अशा अवस्थेत उग्र आत्मविश्वासाने अरुण नाथ देवळालीकरांना भेटायला येतो.
सासऱ्यानं त्याच्या पुस्तकावर भाषण करावं, अशी त्याची अपेक्षा असते. नाथ देवळालीकरांना अरुणच्या वागण्यातील दुटप्पीपणा सहन होत नाही. पुस्तकात माणुसकीच्या गप्पा करणारा अरुण प्रत्यक्ष जीवनात कसा त्याच्या पत्नीला मारहाण करतो हे माहिती असल्यामुळे ते भाषण करण्यास नकार देतात. एव्हाना ज्योती गरोदर झालेली असते. अशा अवस्थेतही अरुण तिला जमेल तेव्हा तिला मारहाण करत असतो. सेवा देवळालीकर आपल्या पतीला विनंती करते की, त्यांनी अरुणच्या पुस्तकावर कौतुक करणारं भाषण करावं. नाही तर तो ज्योतीला अशा अवस्थेतही मारहाण करेल. हतबल झालेले नाथ भाषण देऊन येतात. भाषणातील खोटेपणा ज्योतीला मान्य होत नाही व ती नाथ देवळालीकरांना याबद्दल दोष देते. ती वडिलांना सांगते की, ‘तुमच्यामुळे आमच्यापर्यंत खरं जीवन आलंच नाही व आता आलं तेव्हा त्याचा सामना कसा करावा, हे मला नव्यानं शिकावं लागेल. मी आता पुन्हा या घरात कधीही येणार नाही आणि तुम्ही सुद्धा मला भेटण्यासाठी माझ्या घरी येऊ नका’. या दीर्घ संवादातून या नाटकाच्या गाभ्यात असलेला संस्कृती संघर्ष अधोरेखित होतो आणि नाटक संपतं.
अभिनयाचा दर्जा उत्तम
तेजस अतितकर यांनी अरुण आठवलेची भूमिका समजून-उमजून केल्याचे जाणवले. देवळालीकरांच्या घरी प्रथमच येणारा अरुण मनातून घाबरलेला व रागावलेला असतो. हा राग त्याने त्याच्या प्रेमात पडणाऱ्या ज्योतीवर व्यक्त केला असला तरी भारतीय समाजानं दलितांवर केलेल्या अमानुष अत्याचारांबद्दलही असतो. परस्परविरोधी भावनांच्या तुफानात भरकटत असलेलं मनं, देहबोली व आवाजाच्या चढउतारावरून तेजसने नेमकं व्यक्त केलं आहे. श्रेणिक शिंगवी यांनी सुरुवातीच्या प्रसंगांत नाथ देवळालीकरांचा दुर्दम्य आशावाद व नंतर चिडलेला, मोडलेला, हताश झालेला नाथ देवळालीकर बारकाव्यांनिशी सादर केला.परंतु एका प्रसंगात ते अरुणला प्रकाशराव म्हणून हाका मारतात, हे निदर्शनात आलं. तेजा पाठक यांनी सेवा देवळालीकर अत्यंत संयमाने उत्तम साकारली. सिद्धी कुलकर्णी हिने ज्योती या पात्रात रंगत आणली. मोहित मेहेरने साकारलेला जयप्रकाश ठीक. प्रसाद भणगे यांनी वामनराव नेऊरगावकर व अनंत रिसे यांनी हंबीरराव कांबळे या भूमिका साकारल्या. नेपथ्य – अनंत रिसे, प्रकाशयोजना – गणेश लिमकर, संगीत – शितल देशमुख, रंगभूषा – चंद्रकांत सैंदाणे, वेशभूषा – मैथिली जोशी या नाट्यघटकांनी नाटकाची रंगत वाढवली आहे.
तेंडुलकरी विचारांच्या नाट्याचा आजही प्रभाव
‘कन्यादान’ नाटकातुन तेंडुलकरांनी जातिव्यवस्थेवर प्रकाश टाकतानाच जातिव्यवस्थेतील सामाजिक संबंधांवरही लक्ष केंद्रित केले आहे. जातिव्यवस्था आणि तिच्या विविध छटा दाखविणारे हे नाटक लक्षवेधक, भेदक आणि विचार करायला लावणारे आहे. त्यांनी बौद्धिक गोंधळातून अस्पृश्यतेचा ज्वलंत सामाजिक प्रश्न उपस्थित केला, म्हणूनच ज्योती आणि अरुण यांच्या आंतरजातीय विवाहातून नाथ देवळालीकरांच्या सामाजिक परिवर्तनाच्या स्वप्नांचा चक्काचूर करून मानवी मानसिकतेचे खोल विघटन करण्यात हे नाटक उल्लेखनीय आहे. भारतीय समाजात खूप खोलवर रूतून बसलेल्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारं १९८३ साली लिहिलेलं हे नाटक ४१ वर्षांनंतर पाहताना ही तितकंच विचारप्रवर्तक वाटतं.