संवेदनशील लेखकाचा वेदनादायी प्रवास : ‘दुसरा अंक’
नाट्य समीक्षण
अविनाश कराळे
कलाकार हा संवेदनशील असतो. कलाकाराने निर्मांण केलेली कलाकृती म्हणजे त्या संवेदनशील कलाकाराचे अपत्यच. आपल्या या अपत्यावर तो जीवापाड प्रेम करत असतो. असह्य प्रसव वेदना सहन करून निर्मिलेली कलाकृती हा त्या कलाकाराचा आत्माच. तोच आत्मा जेव्हा विकला जातो. तेव्हा तो संवेदनशील कलाकार हेलावून जातो. अश्याच एका संवेदनशील नाट्य लेखकाची शोकांतिका 63 व्या राज्य नाट्य स्पर्धेत समर्थ युवा प्रतिष्ठान, घोडेगाव. या संस्थेने सादर केलेल्या रविशंकर झिंगरे लिखित आणि संदीप येळवंडे दिग्दर्शित ‘दुसरा अंक’ या नाटकातून पुढे आली.
बँकर असतानाच नाटकांवर प्रेम करणारा उल्हास कोळी हे या नाटकातील मध्यवर्ती पात्र. सातत्याने येणाऱ्या संकटांचा सामना करणारा उल्हास नाटकाचा पहिला अंक लिहून झाल्यानंतर तो पत्नीला वाचून दाखविण्याची इच्छा व्यक्त करतो. परंतु नाटकाचा ‘दुसरा अंक’ पूर्ण झाल्याशिवाय ऐकणार नसल्याचे नेत्रा त्याला सांगते. पत्नीचे आजारपण, वृद्ध वडिलांना दरमहा करावी लागणारी मनीऑर्डर, अशातच नोकरीवर आलेले गडांतर या जबाबदाऱ्यांनी त्रस्त झालेला उल्हास अर्थार्जनाचे मार्ग शोधू लागतो. त्याने लिहिलेल्या नाटकांवर जीवापाड प्रेम करणारी निपुत्रिक नेत्रा ही त्याची पत्नी. दररोज वेगवेगळ्या संकटांचा सामना करत असतो. पतीला स्वतःला काहीही त्रास होत नसल्याचे सांगून सर्व आजारपण अंगावर काढते. नाट्य दिग्दर्शक जयराम व नाटकांचा कॉन्ट्रॅक्टर असलेला नाथा हे उल्हासचे जिवलग मित्र. दोघेही उल्हासला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील असतात. जयरामचे उल्हासच्या तत्त्वपूर्ण लिखाणावर प्रेम असते. नाथा ह्या लिखाणामुळे आर्थिक फायदा होत नसल्याने लोकांना आवडणारे लिखाण केल्यास प्रचंड पैसा मिळेल असा सल्ला देतो. ओढवलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी नाथाचे ऐकून उल्हास लेखणीचा बाजार करणाऱ्या दलालांच्या हातातली बाहुली बनतो. एका प्रॉडक्शन कंपनीसोबत लिखाणाचा करार करून मिळालेल्या आगावू रकमेतून नेत्रावर उपचार करण्याचे ठरवतो. राहिलेला दुसरा अंक ऐकण्याची शेवटची इच्छा नेत्रा व्यक्त करते. व्यावसायिक लिखाणातून वेळ मिळत नसल्याने अर्धवट राहिलेला दुसरा अंक पूर्ण होण्याआधीच नेत्रा जगाचा निरोप घेते. पत्नीची अंतिम इच्छा पूर्ण न झाल्याने स्वतःला दोषी मानून तो दारूच्या आहारी जातो. दुसरा अंक पूर्ण करायचाच असे ठरवून पहिल्या अंकाचा शोध घेतो. परंतु एका निर्मात्याला पहिल्या अंकाचे हक्क विकल्याचे नाथा सांगतो. यापुढे नाटकाचा दुसरा अंक कायमस्वरूपी अपूर्णच राहुन पत्नीची अंतिम इच्छा आपण आता कधीच पूर्ण करू शकणार नसल्याने तो कोलमडतो व कालांतराने जगाचा निरोप घेतो. ओढवलेल्या आर्थिक विवंचनेमुळे चक्रव्यूहात अडकलेल्या उल्हासला इच्छा असूनही त्यातून बाहेर पडता न आल्याने उत्तरार्धाचा ‘दुसरा अंक’ हा त्याच्यासाठी वेदनादायी अन परतीच्या वाटा बंद करणारा ठरतो.
ग्रामीण भागातील कलाकारांचा उत्तम प्रयत्न
दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत नाटक सादर करणाऱ्या ग्रामीण भागातील संदीप येळवंडे यांचा यंदाचा ‘दुसरा अंक’ चांगलाच रंगला. अभिनय व दिग्दर्शनाची दुहेरी जबाबदारी त्यांनी उत्तम पार पाडली. त्यांनी साकारलेला ‘तरुण उल्हास कोळी’ प्रेक्षकांना भावला परंतु अभिनय आणि लांब पल्ल्याचे संवाद बोलताना आवाजातील आरोह-अवरोह यावर त्यांनी आणखी मेहनत घेणे आवश्यक होते. वृद्ध उल्हास कोळी साकारलेले सुरेश चौधरी उत्तम. पत्नी नेत्राची भूमिका डॉ. भावना रणशूर यांनी जिवंत केली. आजारपण आणि आर्थिक विवंचनेमुळे वरतून खंबीर पण आतून खचलेली नेत्रा त्यांनी उत्तम निभावली. मित्रांच्या भूमिकेत मोहन औटी यांनी नाट्य कॉन्ट्रॅक्टर नाथा व योगेश रासने यांनी नाट्य दिग्दर्शक जयराम ताकदीने साकारला परंतु संवाद संपल्यानंतर त्यांचा अभिनय ही संपत होता. मुलाखत घ्यायला आलेले प्रशांत जाधव साकारलेले आदिनाथ बडे व विश्वजित जोशी साकारले राज वैरागर ठीक.