समाजसुधारकांच्या कर्तृत्वाचा वेध घेणारे ‘राजर्षी’
नाट्य समीक्षण
अविनाश कराळे
‘फुले–शाहू–आंबेडकरांचा महाराष्ट्र’ हे भारतीयांचे प्रामुख्याने महाराष्ट्रातील मराठी लोकांचे घोषवाक्य. महाराष्ट्राला महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला आहे. या तीन व्यक्तींनी उपेक्षितांच्या ‘शिक्षण व हक्कासाठी’ संघर्ष केला. ‘फुले-शाहू-आंबेडकर’ या त्रयीचा नामोल्लेख महाराष्ट्रातील समाजकारणात आणि राजकारणात मोठ्या प्रमाणावर केला जातो. शाहू महाराजांनी त्यांच्या काळात मागासवर्गीय लोकांसाठी भरपूर काम केलं. त्यांनी जात,पंथ इत्यादी कोणत्याच गोष्टीची पर्वा न करता प्राथमिक शिक्षण देण्यास प्रथम प्राधान्य दिले होते. त्यांनी राज्यभरातील अनेक मागासवर्गीय लोकांसाठी काम केले. त्यानंतर त्यांना राज्याभिषेक सोहळ्यावेळी ‘राजर्षी’ ही पदवी देण्यात आली. याच विचारवंतांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणारे डॉ. सोमनाथ मुटकुळे लिखित व दिग्दर्शित ‘राजर्षी’ हे दोन अंकी नाटक सोमवारी (०२. डिसें.) संगमनेर येथील संगम ग्रामविकास मंडळ या संस्थेने राज्य नाट्य स्पर्धेत सादर केले.
पडदा उघडताच दृष्टीक्षेपात पडते ते ते एक पोलीस स्टेशन, तुरुंग आणि एका पाठमोरी व्यक्ती. तुरुंगाच्या भिंतीवर महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावलेले असतात. ती पाठमोरी व्यक्ती पोलीस अधिकाऱ्यास सूचना देत असते. पुढच्या प्रसंगात अब्दुल व स्वाती काही गुंड आपल्यावर हल्ला करणार असून स्वतःचा बचाव करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये येतात. परंतु त्यांच्याशी चर्चा केल्यावर संबंधित घटना ही लव्ह-जिहादची असल्याचे पोलिसांना वाटते. काहीवेळाने त्याठिकाणी मौलाना आपला मुलगा अब्दुल हरवला असल्याची तक्रार द्यायला येतात. त्यांच्या नंतर पुरोहित पोलीस स्टेशनमध्ये येऊन आपली मुलगी स्वाती हरवली असल्याची तक्रार दाखल करायला येतात. अब्दुल व स्वातीचा जीव धोक्यात असून त्यांचा तातडीने विवाह लावून द्यावा लागेल असे पोलीस अधिकारी दोघांना सांगतात. ते दोघेही त्यास विरोध करतात. त्या दोघांचे मतपरिवर्तन करण्यासाठी पोलीस अधिकारी महात्मा फुले यांना आमंत्रित करतात. महात्मा फुले मंचावर प्रकट होऊन पोलीस अधिकारी, भोला, अब्दुल आणि स्वाती यांच्याशी संवाद साधतात. ते निघून गेल्यानंतर त्याठिकाणी राजर्षी शाहू महाराज मंचावर अवतरतात. अनेक प्रसंगातून शाहू महाराजांचे कार्य कर्तृत्व दाखवले जाते. सरतेशेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंचावर येतात आणि उपस्थितांशी संवाद साधतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर निघून गेल्यानंतर मौलाना व पुरोहित हे दोघेजण चेहरा लपवून मंचावर येतात व पोलीस अधिकारी, हवालदार, अब्दुल आणि स्वातीला गोळ्या घालून ठार मारतात. मरताना अब्दुल व स्वाती इन्किलाब जिंदाबाद, फुले-शाहू-आंबेडकर जिंदाबाद अशा घोषणा देतात आणि हातात हात घेऊन जीव सोडतात. त्यानंतर चेहरा लपवून आलेले दोघेजण तुरुंगाच्या भिंतीवरील महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिघांच्या फोटोवर गोळ्या झाडतात आणि तिथून पळ काढतात. शेवटी ‘फुले–शाहू–आंबेडकर एकत्रित मंचावर येतात व नाटकाचा पडदा पडतो.
नाटकातील छत्रपती शाहू महाराजांची मध्यवर्ती भूमिका दिनेश भाने यांनी लीलया पेलली. अभ्यासू, न्यायप्रविष्ट, करारी व दूरदृष्टीकोन असणारे शाहू महाराज त्यांनी साक्षात मंचावर उभे केले. त्यांची देहबोली अन वाचिक अभिनय उत्तम. सूर्यकांत शिंदे यांनी साकारलेली महात्मा फुले व अण्णासाहेब यांची भूमिका उत्तम होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एकाच प्रवेशात नरेश बडेकर यांनी प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या. राजन झांबरे यांनी साकारलेला पोलीस अधिकारी, हवालदार भोला साकारलेले बाबासाहेब मोकळ, ज्ञानेश्वर वर्पे यांनी साकारलेला अब्दुल, प्रवीण घुले यांचा पुरोहित व राजाराम शास्त्री, मौलाना साकारलेले राजू अत्तार एम. व सबनीस साकारलेले राजू अत्तार सर यांचा अभिनय ठीक. पूनम कदम यांनी स्वातीची भूमिका जिवंत केली, भूमिकेतील त्यांचा आक्रमकपणा आवडला. सुनील भांडगे यांनी साकारलेला रामशास्त्री व डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी साकारलेला नारायण भट यांच्या भूमिकेस प्रेक्षकांनी दाद दिली. रवींद्र पगार यांचा गंगाराम, विठ्ठल शिंदे यांचा सेवक व शिवण्या कदम हिने निभावलेली छोटी तरुणी ठीक.
लेखन-दिग्दर्शन-अभिनय या तिन्ही जबाबदाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी मोठ्या शिताफीने पार पाडल्या. वसंत बंदावणे यांची प्रकाशयोजना पूरक होती. ज्ञानेश्वर वर्षे व विठ्ठल शिंदे यांनी रंगमंचाचा पुरेपूर वापर करत नेपथ्य साकारले परंतु प्रसंग बदलताना मंचावरील नेपथ्यामध्ये होणारा बदल हा नकळतपणे होणे आवश्यक होते. शंतनू घुले यांचे पार्श्वसंगीत व रमेश पावसे यांचे संगीत संयोजन ठीक होते. चंद्रकांत सैंदाणे यांची रंगभूषा व वंदना जोशी वंदावणे यांची वेशभूषा उत्तम. राजू पवार यांची रंगमंच व्यवस्था केली होती.
नाटकात शाहू महाराजांच्या या कार्यावर टाकला प्रकाशझोत शाहू महाराजांनी मागासवर्गीय-बहुजन समाजाचा विकास, त्यांना शिक्षण, शिक्षणासाठी काही सवलती व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासकीय सेवेत समावेशन या त्रिसूत्रीवर आधारित सामाजिक परिवर्तनाची पायाभरणी करून राजेशाहीतसुद्धा ‘लोकशाही’ प्रस्थापित करता येते, हे दाखवले. प्रशासनात, शिक्षणात व खाजगी सेवेत ब्राह्मणांची मक्तेदारी प्रस्थापित झाली होती. परिणामी ब्राह्मणेतर समाज व प्रामुख्याने मागासवर्ग व मराठा बहुजन समाज प्रवाहाच्या बाहेर फेकला गेला होता. अशा परिस्थितीत ब्राह्मण वर्गाची ही मक्तेदारी कशी मोडून काढता येईल आणि प्रशासनात व राजकीय प्रक्रियेत मागासवर्गीय तसेच बहुजन समाज कसा केंद्रस्थानी येईल, हेच उद्दिष्ट उराशी बाळगून महाराजांनी राज्यकारभार केला. ब्राह्मण वर्गाची सर्व क्षेत्रातील मिरासदारी त्यांनी मोडून काढली. ब्राह्मणशाहीच्या प्रशासकीय वर्चस्वाला हादरा बसवत महाराजांनी प्रथम कुलकर्णी वतने नष्ट केली व त्याजागी खेड्याचा कारभार पाहण्यासाठी 'तलाठी' या पदाची निर्मिती केली. त्याचबरोबर अस्पृश्य जातीतील गुणवंत लोकांना मोठमोठी पदे व अधिकाऱ्याच्या जागा बहाल केल्या.