Uncategorized

प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यास कमी पडलेले ‘पंचमवेद’

अंगातील कलागुण स्वस्थ बसू देत नाहीत. म्हणून मुंबई गाठलेल्या ‘स्ट्रगलर्स’ची संख्या आज भरमसाठ आहे. मायानगरी असलेल्या मुंबईत काम मिळवताना येणारी प्रमाणभाषेची अडचण, राहण्याची अडचण आणि इतर अनेक मर्यादा  येतात. यावर मात करून या चंदेरी दुनियेत आपले नशीब आजमावण्यासाठी अनेकांचा संघर्ष सातत्याने सुरु आहे. मात्र हा संघर्ष निश्चितच सोपा नसतो. चिंचोळ्या खोलीत 6 – 8 स्ट्रगलर एकत्र राहतात. पोर्टफोलिओ घेऊन निर्मात्यांचे आणि स्टुडिओचे उंबरठे झिजवतात. त्यात लोकलमधील धक्के, बसचा प्रवास, अनेकदा पायी प्रवास करीत संघर्ष सुरूच असतो. या सर्व कठीण परिस्थितीत कलागुणांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून कलागुण जपत धावपळ करावी लागते. अशाच स्ट्रगलर तरुणांच्या जीवनावर भाष्य करणार ‘पंचमवेद’ हे दोन अंकी नाटक रवि . दि. 01 डिसें. रोजी 63 व्या राज्य नाट्य स्पर्धेत सप्तरंग थिएटर्स या संस्थेने सादर केले.   

राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पारितोषिक वितरण समारंभाने नाटकाचा पडदा उघडतो. आमदार दादासाहेब नगरकर आणि ज्येष्ठ रंगकर्मी दाजीसाहेब सुखटणकर यांच्या हस्ते राज्य नाट्य स्पर्धेतील विजेते नयन, नामदेव, निखिल, रंगो आणि पी.बाळू यांना अभिनयाची पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येते. पुढे जाऊन याच सिने-नाट्य क्षेत्रात करियर करायचं म्हणून मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबातील नामदेव स्ट्रगल करण्यासाठी मुंबईला जातो, त्यास आई-वडील जाण्यापासून परावृत्त करत असतात. परंतु अभिनयाचं वेड नामदेवला मुंबईला घेऊन जातेच. निखिल हा आमदार दादासाहेबांनी ठेवलेल्या रखेल म्हणून ठेवलेल्या शेवंता (स्वाती बोरा) ह्या कलावंतीनीचा मुलगा. तो ही आई वडिलांची इच्छा नसताना स्ट्रगलसाठी मुंबई गाठतो. नामदेव मुंबईमध्ये पोहोचतो तेव्हा रंगो आणि पी. बाळू हे अगोदरच मुंबईत स्ट्रगल करत असतात. दरम्यान निखिल आणि नयन हे दोघेही स्ट्रगल करण्यासाठी मुंबईत दाखल होतात. हे पाचही जण एकाच ठिकाणी एकत्र राहू लागतात. काम मिळविण्यासाठी प्रत्येकाची काही ना काही धडपड सुरु असते. रंगोने एका मालिकेमध्ये आक्षेपार्ह संवाद उच्चारल्यामुळे भावना दुखावल्याचे कारण पुढे करत काही गुंड येऊन ह्या पाचही जणांना काळे फासतात. व या प्रकाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करतात. झालेला हा त्रास सहन न झाल्याने नामदेव, रंगो आणि पी बाळू मुंबई सोडून पुन्हा आपापल्या गावी जायला निघतात. बस स्थानकावर त्यांची भेट ज्येष्ठ रंगकर्मी दाजीसाहेब यांच्याशी होते. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तिघांचा ही मुंबई सोडून जाण्याचा बेत कॅन्सल होतो. तेवढ्यात नयन रंगोला फोन करून निखिल ने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे फोन करून सांगते. हे तिघे ही दाजीसाहेबांना घेऊन घरी येतात. दाजीसाहेबांनी कलेचे महत्व समजावून सांगत सर्वांना पुन्हा धीर देत त्यांचे मनोबल वाढवतात. व कॅमेऱ्याच्या नादात नाळ तुटलेल्या रंगभूमीशी पुन्हा नाळ जोडतात. दाजीसाहेब सर्वांना घेऊन एक नाटक बसवतात व बसवलेल्या नाटकाच्या सादरीकरणाने खऱ्या नाटकाचा ही पडदा पडतो. 

30 दशकाहून अधिक काळ सातत्याने राज्य नाट्य स्पर्धा करणारी एकमेव संस्था म्हणून सप्तरंग थिएटर्सचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. आजवरच्या काळात या संस्थेने सादर केलेली अनेक गाजलीत, परंतु या वर्षी सादर केलेले ‘पंचमवेद’ हे नाटक रसिक प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेण्यास काहीसे कमी पडले असे वाटते. आजवर ‘तप्त दाही दिशा’, मथुरेचा बाजार यासारखी मनोरंजनात्मक व वैचारिक दर्जाची नाटकं लिहिलेल्या डॉ. राजेंद्र धामणे यांचे हे ‘पंचमवेद’ नाटक तितकेसे परिपूर्ण  वाटले नाही. त्यामुळे साहजिकच सादरीकरणात मर्यादा आल्या. नयन ही मध्यवर्ती भूमिका साकारणारी आकांक्षा शिंदे हिने आपल्या भूमिकेस न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मुंबईत काम मिळवताना लागणारी ‘बिनधास्त बोल्ड गर्ल’ नयन ची भूमिका आकांक्षाने आत्मविश्वासाने वठवली. निखिल साकारणारा तेजस आंधळे याने आपल्या देहबोलीचा सुयोग्य वापर करत नाटकात रंगत आणली. याशिवाय रंगो साकारणारा ऋषिकेश सकट, पी. बाळू साकारणारा पराग पाठक आणि नामदेव साकारणारा पृथ्वी सुपेकर हे काहीसे नवखे वाटले. दाजीसाहेब ही ज्येष्ठ रंगकर्मी साकारणाऱ्या सागर अधापुरे यांनी आपली भूमिका उत्तम वठवली. नाट्यक्षेत्राविषयी असणारी आस्था, अभ्यास, तळमळ दाखवताना कायिक व वाचिक अभिनयावर पुरेपूर मेहनत घेतल्याचे जाणवले. आमदार दादासाहेब ही भूमिका साकारलेल्या प्रा. डॉ. सचिन मोरे यांनी आपल्या वाट्याला आलेल्या दोनच प्रसंगात आपल्या अभिनयाची छाप उमटविली.  एकाच छोट्याश्या प्रसंगात शेवंता हे भूमिका स्वाती बोरा यांनी उत्तम रेखाटली. नामदेवच्या वडिलांच्या भूमिकेत प्रा. सुनील कात्रे व आईच्या भूमिकेत राखी गोरखा यांनी उत्तम कामगिरी केली. काळे फासण्यासाठी एकाच प्रसंगात गुंड म्हणून आलेले दीपक ओहळ, मारुती गुंजकर आणि कल्पेश शिंदे आपला प्रभाव पाडण्यास प्रचंड कमी पडले. त्यांचा रंगमंचावरील वावर पूर्णपणे नाटकी वाटला. जागृती पाटील हिने साकारलेली निवेदिका ठीक. नाटकाची सुरुवात अनुष्का बेदरे, तेजस्विनी येनगंदुल, अनुष्का बडवे आणि रिया मुथियान यांनी आपल्या नृत्याविष्कारातून उत्तम केली. 

‘पंचमवेद’ प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यास दिग्दर्शक म्हणून प्रा. डॉ. श्याम शिंदे काहीसे कमी पडले. दीपक ओहोळ, सुधीर देशपांडे आणि समीर कुलकर्णी यांनी गमंचाचा पुरेपूर वापर करत प्रसंगानुसार साकारलेले नेपथ्य उत्तम. विक्रम गवांदे आणि गीता शिंपी यांची प्रकाशयोजना आणखी अभ्यासपूर्ण हवी होती. अनेक प्रसंगात कलाकारांचे चेहरेच दिसत नव्हते. श्रावणी हाडोळे आणि कल्पेश शिंदे यांचे संगीत संयोजन उत्तम. सुनील महाजन आणि महिर कुलकर्णी यांचे काव्यलेखन, पवन नाईक व  ऋतुजा पाठक यांचे गायन ठीक. चंद्रकांत सैंदाणे यांनी रंगभूषा व वेशभूषा ठीक. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please Disable Ad-Blocker