Uncategorized

कधी आंबट, कधी गोड.. नाटकाने प्रेक्षकांना दिला हास्याचा मनमुराद आनंद 

नाट्य समीक्षण – 

अविनाश कराळे 

कुटुंब म्हणजे परस्परांशी नाती असलेल्या माणसांचा समूह व आपल्या समाज व्यवस्थेचा अविभाज्य घटक. प्रेम, लोभ, मोह, माया, मत्सर, द्वेष, हेवा, आकस, आपुलकी या सर्व भावभावनांनी ओतप्रोत भरलेल्या या गुंतागुंतीच्या कुटुंब नामक कथेतील  पात्रं म्हणजे नात्याने बांधलेले कुटुंबातील सदस्य. प्रत्येकाचं एक-दुसऱ्यासोबतचं नातं वेगळं, समीकरण वेगळं. हेवेदावे वेगळे, संभाषण वेगळं. त्यामुळे साहजिकच कुटुंब हा विषय लेखक-दिग्दर्शकांना आकर्षित करून घेतो. अशाच कौटुंबिक विषयावर प्रकाशझोत टाकणारे ‘कधी आंबट.. कधी गोड..’ हे दोन अंकी विनोदी  नाटक 63  राज्य नाट्य स्पर्धेत कोपरगावच्या संकल्पना फाऊंडेशन या संस्थेने शनि. (30 नोव्हें.) सादर केले.

बँकेत काम करणारा ओमकार (डॉ. मयूर तिरमखे) हा एका छोट्याशा गावातून प्रमोशन आणि ट्रान्सफर घेऊन पत्नी कल्पना (डॉ. श्रद्धा तिरमखे), सासू यशोदा (कल्याणी बनसोडे) आणि मेव्हणा विनोद (प्रथमेश पिंगळे) यांना सोबत घेऊन पुण्यात नव्याने राहायला आलेला एक तरुण.  त्याची पत्नी कल्पना ही लहानपणापासूनच घरची परिस्थिती हलाखीची असल्याने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी नोकरी मिळत नाही म्हणून उद्योजिका होण्याच्या उद्देशाने अनेक व्यवसाय करते, पण एकाही व्यवसायात तिला यश मिळत नाही. जोपर्यंत व्यवसायात यश मिळत नाही तोपर्यंत आई होणार नसल्याचा निश्चय तिने केलेला असतो. विनोद हा कोणताही कामधंदा न करता ऍक्टर होण्याचं खूळ डोक्यात घेऊन आपल्याच धुंदीत राहत असतो. पुण्यात राहायला आल्यानंतर कल्पना ही आई आणि भावाच्या मदतीने चटणी आणि मसाल्याचा नवीन गृह उद्योग करण्याचा प्रस्ताव ओंकारला देते. 

परंतु कल्पनाचा व्यवसायाच्या बाबतीतला पूर्वानुभव लक्षात घेता तो तिला कोणत्याही व्यवसायाच्या भानगडीत न पडता घरात करमत नसल्यास मस्त एन्जॉय करून दिवस घालवावा, असे सुचवतो. यासाठी तिला मनवण्यासाठी तो मित्र आणि नाटकाचा सूत्रधार (डॉ. किरण लद्दे) याचीही मदत घेतो. व्यवसाय करण्यापासून तिला परावृत्त करण्यासाठी ओमकार आपल्या मित्राच्या मदतीने विनोदला स्वतःच्या बाजूने करतो व कल्पना व तिच्या आईचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो. परंतु आपल्या व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या हट्टावर ठाम असलेली कल्पना कोणाचं ही ऐकण्याच्या मानसिकतेत नसते. शेवटी कल्पनाची इच्छा योग्यच आहे हे लक्षात आल्यावर ओमकार कल्पनाला नवीन व्यवसाय करण्यासाठी परवानगी देतो व सर्वतोपरी सहकार्य करून शेवटी तिला यशस्वी उद्योजिका बनवतो. याच दरम्यान कल्पना व ओमकार यांना जुळे मुलगा-मुलगी होतात. विनोद ही मोठा ऍक्टर होऊन कल्पनाच्या यशोदा मसालेचा ब्रँड अँबिसिडर बनतो व गोड शेवटाने नाटकाचा पडदा पडतो.

विनोदी शैलीत सादर झालेले हे नाटक स्त्रियांच्या मनातील घुसमटीचा वेध घेत आजच्या पुरुष प्रधान कुटुंब पद्धतीवरही सणसणीत कोरडे ओढणारे आहे. आजची स्त्री कशी आहे… ? व भविष्यात कर्तृत्ववान  होऊन कशी असेल…? याची प्रत्यकारी चुणूक ‘कधी आंबट, कधी गोड’ या नाटकात पहायला मिळते. स्त्रीयांचे पारंपरिक साचेबंध अनुभव आणि त्यात आधुनिक विचारांच्या तरुणीची होणारी घुसमट नाटकाचे लेखक व दिग्दर्शक डॉ. किरण लद्दे यांनी प्रत्ययकारकने मांडलेली आहे. डॉ. मयूर तिरमखे यांनी साकारलेला ओमकार उत्तम. प्रसंगाचे भान, विनोदाचे अचूक टायमिंग, कायिक व वाचिक अभिनयावर असलेले प्रभुत्व या भूमिकेस न्याय देऊन गेला. डॉ. श्रद्धा तिरमखे यांनी साकारलेली कल्पना ही योग्यच. स्वतःच्या पायावर उभी राहण्यासाठी धडपडणारी स्त्री डॉ. श्रद्धा यांनी हुबेहूब रेखाटली. विनोद या भूमिकेत प्रथमेश पिंगळे याने जीव ओतला. यशोदा पात्र साकारलेल्या कल्याणी बनसोडे यांचा अभिनय ही ठीक या पात्रावर दिग्दर्शकाने आणखी मेहनत घेणे आवश्यक होते. लेखन अन दिग्दर्शन या दोन्ही महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडताना सूत्रधार उत्तमप्रकारे रेखाटत डॉ. किरण लद्दे यांनी नाटक नेटकेपणाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 

सर्व पात्रांनी वैयक्तिक अभिनय उत्तम केला असला तरी सर्व पात्रांची कुटुंब म्हणून एकत्रीत केमिस्ट्री कुठेही दिसली नाही. यावर दिग्दर्शकाने आणखी मेहनत घेणे आवश्यक होते. महेश धर्माधिकारी यांचे शीर्षकगीत उत्तम.   चेतन गवळी आणि अमित तिरमखे यांचे नेपथ्य परिणामकारक होते. सुमित खरात यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी पार पाडताना आणखी अभ्यास करणे आवश्यक होते. स्पर्धेतील विनोदी नाटकाचे संगीत संयोजन करताना हार्मोनियमवरील मेलोड्रॅमॅटिक ट्रॅक काहीसे खटकले. गणेश सपकाळ यांची प्रकाशयोजना ठीक. मोनिका सपकाळ यांची रंगभूषा तसेच डॉ. आस्था तिरमखे व स्नेहल लद्दे यांची वेशभूषा प्रसंगास साजेशी.       

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please Disable Ad-Blocker