महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शपथ
मुंबई, ( ऑनलाइन प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ते बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला महायुतीचे राज्यभरातील समर्थक, कार्यकर्ते उपस्थित होते. सिनेसृष्टीमधील दिग्गजांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली.
मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष
राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. त्यानंतर आता पाच डिसेंबर रोजी राज्यात सरकार अस्तित्वात आले. गुरुवारी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. गुरुवारी या तिघांशिवाय कोणीची शपथ घेतली नाही. आता मंत्रिमंडळाचा विस्तार 11 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात कोणा कोणाला स्थान मिळते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेण्याचा विक्रम केला. त्यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पिंक जॅकेट घातला होता. तसेच मी शपथ घेतो ऐवजी त्यांनी ‘गांभीपूर्वक प्रतिज्ञा करतो की…’ या शब्दाचा वापर करत वेगळपणा सिद्ध केला.