निसर्गोपचार संस्थेला पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परवानगी द्या
खा. नीलेश लंके यांची मंत्री प्रताप जाधव यांच्याकडे मागणी
नगर, ( प्रतिनिधी ) – पुणे येथील राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेला पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी परवाणगी देण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय आयुष मंत्री प्रताप जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे गुरूवारी केली. मंत्री जाधव यांना देण्यात आलेल्या निवेदनात खासदार लंके यांनी नमुद केले आहे की, सन 2021 मध्ये कोरोना महामारीसाख्या भयंकर आजरावर मात करण्यासाठी आपण आपल्या मतदारसंघात 1 हजार 100 बेडचे कोव्हीड सेंटर चालविले. या कोव्हीड सेंटरमध्ये नियमित उपचार पध्दती बरोबरच आयुर्वेद, निसर्गोपचार व योगा अशा पध्दतींचा अवलंब करून उपचार करण्यात आले. त्यातून अनेक रूग्णांनी कोरोनावर मात केली.
काही महिन्यां पूर्वी आयुष मंत्रालयाच्या आखत्यारीत येणाऱ्या पुणे येथील राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेस भेट दिली. त्यावेळी असे निदर्शनास आले की, संपूर्ण संकुलाची रचना तसेच उत्तम प्रकारचे नियोजन तिथे आहे. या निसर्गोपचार संस्थेस दिलेल्या भेटी दरम्यान झालेल्या चर्चेतून पुढे आलेल्या गोष्टींनुसार या संस्थेस पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी देणे गरजेचे आहे.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने या संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या बी.एन.वाय.एस. या पदवीच्या शिक्षणाचा कालावधी साडेपाच वर्षांचा करण्यात यावा, जेणेकरून या अभ्याक्रमाला इतर राज्यातही मान्यता मिळू शकेल याकडे खा. लंके यांनी मंत्री जाधव यांचे लक्ष वेधले. खा. लंके यांनी केलेल्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून निर्णय घेण्याची ग्वाही मंत्री जाधव यांनी यावेळी दिली.
डॉक्टर पदवीसाठी परवानगी द्या
राज्य शासनाच्या 31 जानेवारी 2019 च्या निर्णयानुसार महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यामार्फत योग व निसर्गोपचार पदवी बीएनवायएस या अभ्याक्रमास मान्यता देण्यात आलेली आहे. हा अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या उमेदवारांना डॉक्टर ही पदवी लावण्यास परवाणगी नाही. ही अट रद्द करून हा अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या व्यक्तिस डॉक्टर ही पदवी लावण्यास परवानगी देण्यात यावी. तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये बीएनवायएस चा अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर डॉक्टर ही पदवी लावण्यास परवानणी देण्यात आल्याचेही खा. लंके यांनी या निवेदनात नमुद केले आहे.