Uncategorized

आशय हरवलेले ‘प्रियंका आणि दोन चोर’ 

नाट्य समीक्षण

अविनाश कराळे

६३ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या नगर केंद्रावर सादर होणाऱ्या नाटकांपैकी काही संहिता ह्या प्रख्यात अन प्रयोगशील लेखकांच्या आहेत, त्यात लेखक श्याम मनोहर यांचे ‘प्रियंका आणि दोन चोर’ हे नाटक स्व. गिरीधारीलाल चौधरी अभिनव ग्राम प्रबोधिनी, अहिल्यानगर या संस्थेने बुधवारी (दि. २७) सादर केले. श्याम मनोहरांच्या लेखनावर प्रेम करणारी पिढी आता प्रौढत्वाकडे झुकली असली तरी नव्या पिढीतही त्यांच्या लेखनशैलीविषयी आणि जीवनविषयक चिंतन वेगळ्या प्रकारे मांडण्याविषयी औत्सुक्य कायम आहे. ‘प्रियंका आणि दोन चोर’ हे नाटक श्याम मनोहरांच्या इतर नाटकांच्या तुलनेत थोडेसे डावे ठरण्यासारखे आहे, कारण या नाटकात प्रत्यक्ष घटना अशा फार घडत नाहीत. जे काही घडतं ते संवाद, संवाद आणि संवादातून ! साहजिकच नाटकाची दृश्यात्मकता वाढवण्यासाठी प्रमुख तीन पात्रांनी आपले अनुभव सांगण्यास सुरुवात करताच ते प्रसंग पुन्हा वेगळी पात्रे रंगमंचावर आणत सादर करण्याला पर्याय उरत नाही. या नाटकामध्ये हेच करण्यात आलेय. माणसानं नेहमी जे आपल्याला मिळालं त्यावर समाधानी राहण्यापेक्षा जे आपल्याला मिळत नाहीये त्याबद्दल निराश राहावं का? माणसाच्या प्रगतीचा मार्ग त्यातूनच सापडू शकतो का? – की माणसानं नेहमी गरीब राहावं म्हणजे छोट्यामोठ्या जीवनावश्यक बाबींची पूर्ततादेखील खूप आनंद देणारी ठरू शकते? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न श्याम मनोहरांनी ‘प्रियंका आणि दोन चोर’ या नाटकातून केला आहे. 

प्रियंका आणि दोन चोर नाटकातील एक दृश्य

प्रियंका म्हणजे रेणुका ठोकळे एका बांधकामावरच्या वॉचमनची बायको. पदरात एक लहान पोर. नवऱ्याला दारूचे व्यसन. हातात पडणारी मिळकत अगदीच कमी म्हणजे हातावरचंच पोट. प्रियंकाचं सगळ्यात मोठं स्वप्न म्हणजे आठ दिवसांचा बाजार एकाच वेळी करणं. त्यामुळे अनेक श्रीमंतांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करणारी प्रियंका ती राहत असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीच्या गच्चीवर बिल्डरच्या अपरोक्ष दोन तरुणांना आश्रय देते आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून भाडे म्हणून माफक पैसेही घेते. आश्रयाला आलेले हे दोन तरुण म्हणजे चेन, मंगळसूत्र आणि हाताला लागेल ती किरकोळ चोऱ्या करणारे चोर. आपण चोर वाटू नये, चोरासारखे दिसू नये म्हणून त्यांची राहणी मात्र टापटीप-टाय व बुटातली. यापैकी एकजण आपल्याला घालायला सोन्याची चेन हवी, पण ती दोन दिवसातल्या चोरीत मिळाली नाही म्हणून निराश, तर दुसरा मिळालेल्या पैशातून एक दारूची बाटली व बिर्याणी आणून तिचा आस्वाद घेत सुखी होऊ पाहणारा. प्रियंकाला खूप प्रयत्नानंतर आठ दिवसांचा बाजार एकावेळी करणं शक्य झाल्यानं मनापासून आनंद झालेला, पण तो कुणापुढे व कसा व्यक्त करावा हेच कळत नाही आणि आनंद कोणाबरोबर वाटून घेता आला नाही तर त्या आनंदाला काय अर्थ आहे? – म्हणून प्रियंका पुनःपुन्हा या दोन चोरांच्या जवळ घुटमळत आपल्या पद्धतीनं आपला आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. हे करत असताना तिला आपण ज्या ज्या ठिकाणी काम केले तेथील बायकांचे किस्से आठवत राहातात. ती बडबड करत राहते. दोन चोरांनाही आपले काही अनुभव एकमेकाला सांगावेसे वाटतात आणि त्यातून चंगळखोर समाज आणि जीवनावश्यक वस्तूंसारख्या छोट्या बाबींमधून जगण्यातला आनंद शोधणारे समाजघटक यांचे चित्र प्रेक्षकांसमोर उभे केले जाते.

संपूर्ण प्रयोग सादर होत असताना प्रेक्षकांकडून जी दाद मिळाली ती वरवरच्या विनोदांना अधिक होती. कृष्णा वाळके यांनी अभिनय आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी पार पाडताना दिग्दर्शक म्हणून प्रभाव कमीच जाणवला. हर्षद पगारे यांनी साकारलेले नेपथ्य मोजके आणि नेमकी वातावरण निर्मिती करणारे आणि म्हणूनच दाद देण्याजोगे. तुषार बोरुडे यांची प्रकाशयोजना, राकेश इंगवले यांचे पार्श्वसंगीत, भारत पवार यांची वेशभूषा आणि प्रेरणा मोहिते यांची रंगभूषा या बाबी ठाकठीक म्हणाव्यात अशा. प्रियंकाच्या भूमिकेतील  रेणुका ठोकळे हीने आपली भूमिका सहजतेने निभावताना चांगलीच छाप पाडली. कृष्णा वाळके आणि प्रतीक अंदुरे यांनी आपल्या भूमिका साकारताना खूप कष्ट घेतले आहेत. एकूण संघाचे प्रयत्न प्रामाणिक, पण पूर्णपणे पकड घेणारे किंवा नाटकाचा हेतू साध्य करण्यात यशस्वी म्हणता येण्यासारखे अजिबात नव्हेत.

न उमगलेले नाटक - 
अनेक स्पर्धांमधून 'प्रियंका आणि दोन चोर' हे नाटक सादर होत असते. त्याची कारणे बहुधा नाटकाचे नेपथ्य सोपे आहे, तीनच पात्रे आहेत. रंगभूषा - वेशभूषेचे अवडंबर नाही. थोडक्यात नाटक सोपे आहे, असा बहुधा सादरकर्त्यांचा ग्रह होत असावा. त्या तांत्रिक दृष्टीने नाटक सोपे आहे. हे एका मर्यादित अर्थाने मान्य. परंतु आशयाचे गांभीर्य, त्याची खोली, अर्थपूर्णता हेच जर सादरकर्त्या संघाला समजले नसेल तर बाकीच्या सोपेपणाला काही अर्थ नसतो. त्यामुळेच हे नाटक पाहिल्यानंतर सादरकर्त्यांना नाटक उमगले नाही हे स्पष्ट जाणवले.
चोरही होतो अस्वस्थ
प्रियंकाला आठवडाभराचे साहित्य एकदम भरून ठेवायला मिळाले. त्यामुळे आज फार आनंद झालेला आहे. एक चोर त्याला आज चोरी करण्यात गळ्यातली चेन मिळाली नाही म्हणून तो अस्वस्थ आहे. दुसऱ्या चोराचीही जीवनाकडून अशीच छोटी-मोठी अपेक्षा आहे. पण छोट्या लोकांच्या या छोट्या अपेक्षाही नियती पूर्ण होऊ देत नाही. असा गंभीर आशय मांडणारे हे नाटक आहे. तिन्ही कलावंतांनी त्यांच्या त्यांच्या आकलनाप्रमाणे, कुवतीप्रमाणे आपापल्या भूमिका वठवल्या. ही संहिता अधिक संवेदनशील प्रगल्भ दिग्दर्शक-कलावंतांकडे जायला हवी होती म्हणजे प्रयोग अधिक उठावदार झाला असता असे मात्र सतत वाटत राहते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please Disable Ad-Blocker