राजकीय

अबब..65 टक्के नवनिर्वाचित आमदारांवर गुन्हे !

मुंबई : विधानसभेत निवडून आलेल्या सर्वपक्षीय 288 आमदारांपैकी 65 टक्के आमदारांवर विविध स्वरूपांचे गुन्हे दाखल आहेत. त्यातही 118 म्हणजेच 41 टक्के आमदारांविरोधात गंभीर  गुन्हे दाखल आहेत. यामध्ये  हत्या, अपहरण, हत्येचा प्रयत्न करणे, महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचारासारख्या गंभीर गुन्हयांची नोंद असल्याची बाब समोर आली आहे.

नवनिर्वाचित आमदारांमध्ये 22 महिला आहेत. वयोमानानुसार सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ (77 वर्षे), दिलीप सोपल (75 वर्षे) आणि गणेश नाईक (74 वर्षे) यांचा क्रम लागतो. तर राष्ट्रवादीचे (शरद पवार) रोहित पाटील (25 वर्षे) सर्वात तरुण आमदार असून त्यांच्यानंतर अनुक्रमे भाजपचे करण देवतळे (29 वर्षे), राघवेंद्र पाटील (31 वर्षे) आणि शिवसेना (ठाकरे) वरुण देसाई (32 वर्षे) यांचा क्रमांक लागतो.

निवडणुकीच्या निकालावर ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस् ’( एडीआर) आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचच्या ताज्या अहवालानुसार निवडून आलेल्या 288 आमदारांपैकी (त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील तपशीलानुसार) 65 टक्के (187) उमेदवारांवर विविध स्वरूपांचे गुन्हे दाखल आहेत. त्यातही 118 (41 टक्के) उमेदवारांविरोधात बलात्कार, महिलांवर अत्याचार, हत्या, हत्येचा प्रयत्न, भ्रष्टाचार, निवडणुकीशी सबंधित असे गंभीर स्वरूपांचे गुन्हे दाखल आहेत.

भाजपच्या 132 पैकी 92 (70 टक्के) आमदारांवर विविध गुन्हे दाखल असून त्यातही 40 टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिवसेना (शिंदे) 57 आमदारांपैकी 38 आमदारांवर(67 टक्के) गुन्हे दाखल असून त्यातही 47 टक्के आमदारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. राष्ट्रवादीच्या(अजित पवार) 41 पैकी 20 (49 टक्के) आमदारांवर गुन्हे दाखल आहेत.तर शिवसेना (ठाकरे) 20 पैकी 13, काँग्रेसच्या 9 आणि शरद पवारांच्या पक्षातील पाच आमदारांवर गुन्हे दाखल आहेत.

साजिद पठाण सर्वात गरीब आमदार.
अजित पवारांच्या पक्षाचे 100 टक्के आमदार करोडपती असून भाजप, शिवसेनेचे 98 टक्के आमदार करोडपती आहेत. काँग्रेसचे साजिद पठाण सर्वात गरीब आमदार असून त्यांची एकूण मालमत्ता फक्त 9 लाखांची आहे. भाजपचे शाम खोडे आणि गोपीचंद पडळकर यांची मालमत्ता अनुक्रमे 31 लाख आणि 65 लाख रुपये आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please Disable Ad-Blocker