Uncategorized

हास्य जल्लोषात न्हाऊन निघाले ‘ती तिचा दादला आणि मधला’

नाट्य समीक्षण

अविनाश कराळे.

नवरा बायकोच्या नात्यावर आजवर अनेक नाटकं रंगमंचावर सादर झालेली आहेत. त्यापैकी काही नाटकं ही विनोदी अंगाने जाणारी होती तर काही गंभीर स्वरुपाची होती. कडू औषधाचा डोस गोडातून दिला की तो कडू लागत नाही असे म्हटले जाते. त्यामुळेच अनेकदा अशा नात्यांवर आधारित नाटके ही विनोदी अंगानेच सादर केली जातात. ६३ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अहिल्यानगर केंद्रावर वात्सल्य प्रतिष्ठान या संस्थेने मंगळवारी (दि. २६) प्र. ल. मयेकर लिखित ‘ती तिचा दादला आणि मधला’ हे नाटक सादर केले. पती-पत्नीच्या नात्यावर आधारित असलेले हे नाटक विनोदाच्या आवरणाखाली सादर करण्यात आले. नाटकाचा विषय जरी पती-पत्नीच्या नात्यांचा असला तरी तो विनोदी शैलीत वेगळ्या प्रकारे मांडण्यात आल्याने हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.

‘नीलम’ आणि ‘चंदन’ हे मराठी चित्रपटातील एका गाण्यावर नृत्य करतानाच्या दृश्याने नाटकाचा पडदा उघडतो. पडदा उघडताच दिसतो तो एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या घराचा दिवाणखाना. ‘नीलम’ ट्रक ड्रायव्हर असणाऱ्या पती ‘जालिंदर शिंदे’ याच्यासोबत या घरात राहात असते. प्रेमविवाह केलेल्या नीलम आणि जालिंदरच्या लग्नाला अनेक वर्षे झालेली असतात. परंतु कालांतराने जालिंदरच्या रागीट अन तापट स्वभावाला कंटाळून नीलम एमएसईबी मध्ये काम करत असणाऱ्या चंदनच्या प्रेमात पडते. जालिंदरच्या गैरहजेरीत चंदनचे नीलमच्या घरी येणे-जाणे सुरू असते. चंदन आणि नीलमच्या प्रेम प्रकरणाची चाहूल स्त्री लंपट असणाऱ्या चंदनच्या काकाला लागते. नीलमच्या घरी आल्यानंतर तिला पाहिल्यावर काकाच नीलमच्या प्रेमात पडतो. काका नीलमच्या घरी आलेला असतानाच त्याची गाठ जालिंदरशी पडते. काकाला घरात पाहून ‘तो कोण आहे…?’ असं विचारल्यावर ती सारवासारव करत जालिंदरला तो आपला ‘काका’ असल्याचे सांगते. काहीवेळात तिथे चंदन प्रवेशतो. काका जालिंदरला चंदन हा नीलमचा नात्यातला भाऊ असल्याचे सांगतो. जालिंदर हा चंदनला पसंत नसल्याने लग्न झाल्यापासून आजवर कधीच त्याने नीलमच्या घरी पाय ठेवला नसल्याचे काका जालिंदरला सांगतात. दरम्यान एका लग्न झालेल्या स्त्री सोबत चंदनचे प्रेम प्रकरण सुरू असून त्या दोघांना एकत्र येण्यात चंदनच्या प्रेयसीच्या नवऱ्याचा अडथळा असल्याचे काका जालिंदरला सांगतात. काहीही झालं तरी चंदनला त्याच्या प्रेयसी सोबत एकत्र आणण्याचा चंग जालिंदर बांधतो, यासाठी प्रेयसीच्या नवऱ्याचा काटा काढण्याचा प्लॅन काका व जालिंदर मिळून ठरवतात. तिकडे काका चंदनशी बोलून त्याच्या व नीलमच्या मार्गातील खरा अडथळा ठरत असणाऱ्या जालिंदरला संपविण्यासाठी मर्डर स्पेशालिस्ट असणाऱ्या ‘आ.ज. काळसेकर’ या व्यक्तीची मदत घ्यायचं ठरवून त्याला नीलमचा ‘मामा’ म्हणून या कटात सामील करून घेतो. तिकडे जालिंदर ह्या प्रकरणात पुढे जात असताना चंदनला त्याची प्रेयसी मिळवून देण्यासाठी रिक्षाचालक असणाऱ्या ‘बाजीराव’ला शोधून आणतो. परंतु शेवटी चंदनची प्रेयसी दुसरी तिसरी कोणी नसून नीलमच असल्याचे जालिंदरच्या लक्षात येते. त्यानंतर नीलमच्या अश्या वागण्याला तो स्वतःच दोषी असल्याचे समजून नीलमला घटस्पोट देऊन चंदनसोबत जाण्याचे सांगतो. नीलमला ही तिची चूक लक्षात येते आणि ती ही चंदनसोबत जाण्यास नकार देते आणि गोड शेवटाने नाटकाचा पडदा पडतो, असे काहीसे या नाटकाचे कथानक.

‘नीलम’ या मुख्य पात्रास पल्लवी दिवटे हिने आपल्या सहज सुंदर अभिनयातून प्रेक्षकांसमोर आणले. नवरा आणि प्रियकर या दोघांना ही मुठीत ठेवणारी करारी, पण प्रसंगी भावूक अन हळवी नीलम विनोदी शैलीत पल्लवी हीने उत्तम साकारली. पल्लवीची कायिक आणि वाचिक अभिनयावर असलेली मजबूत पकड नीलम या पात्रास वेगळ्या उंचीवर घेऊन गेली.
जालिंदरच्या भूमिकेत मोनेश ढाळे याने बहार उडवली. त्याचे चेहऱ्यावरील हावभाव मस्तच. रागीट, तापट ट्रक ड्रायव्हर मोनेश ढाळे याने उत्तम साकारला. प्रेयसीच्या नवऱ्याला घाबरणारा, पण त्याचवेळी तिच्यावर मनापासून प्रेम करत शेवटी तिच्यापासून दूर होणाऱ्या प्रियकर चंदनची भूमिका अजय लाटे याने लीलया पेलली. अभिनय आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी पार पाडताना नानाभाऊ मोरे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. त्यांनी साकारलेल्या काका ह्या पात्राने नाटकाची रंगत अधिक वाढवली. रिक्षावाला ‘बाजीराव’ ह्या छोट्याश्या भूमिकेस महेश ढवळे याने न्याय देण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. संपुर्ण नाटकभर लक्षात रहाते ते शुभम घोडके याने साकारलेले मर्डर स्पेशालिस्ट ‘आ.ज. काळसेकर’ चे मामा हे पात्र. रंगमंचावर प्रवेश केल्यापासून ते शेवटपर्यंत या पात्राने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. सडपातळ अन लवचिक असणाऱ्या देहयष्टीचा भूमिकेसाठी केलेल्या परिपूर्ण वापरामुळे या भूमिकेस प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली. एकंदरीत सर्वच कलाकारांनी रंगमंचावर बहार उडवली.

सर्वच पात्रांच्या विनोदी भूमिकांना शैलेश देशमुख यांनी दिलेले संगीत आणि गणेश लिमकर व सोहम दायमा यांनी प्रसंनगानुरूप केलेली प्रकाशयोजना पूरक होती. मामा काळसेकरच्या भूमिकेस दिलेले विशिष्ट संगीत आणि टेबल लॅम्पचा प्रकाशयोजनेत केलेला वापर उत्तम. अंजना मोरे यांनी साकारलेले नेपथ्य उत्तम. चंद्रकांत सैंदाने यांची रंगभूषा आणि रोहिणी बिडवे यांनी केलेली वेशभूषा साजेशी होती.

विनोदी असणाऱ्या नाटकाच्या या संहितेस कलाकारांनी ताकदीने सादर करण्याचा प्रयत्न केल्याने हे नाटक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरले खरे, परंतु नृत्याचा प्रभावी वापर व कलावंतांचा रंगमंचीय वावर, त्यांचे कम्पोझिशन्स यांचा विचार करता रंगमंचाचा केलेला पुरेपूर वापर प्रशंसनीय आहे. मात्र कलावंतांचे शब्दोच्चार व आवाज यावर दिग्दर्शक नानाभाऊ मोरे यांनी मेहनत घेणे आवश्यक वाटते. कारण नाट्याची परिणामकारता वाढविण्यासाठी कलावंतांच्या अभिनयाबरोबरच आवाजालाही तेवढेच महत्त्व आहे.

शुक्र. दि. २९ नोव्हें. रोजी सादर होणारे नाटक
▪️नाटक : ब्लॅक अँण्ड व्हाईट
▪️लेखक दिग्दर्शक : कैलास सोनवणे
▪️वेळ : रात्रौ ८.०० वा.
▪️संस्था : स्माईल फाऊंडेशन, अहिल्यानगर

9823297529

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please Disable Ad-Blocker