महायुतीचा संभाव्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला
कुणाच्या वाट्याला किती मंत्रिपद?
मुंबई, (ऑनलाईन प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले. या निवडणुकीत महायुतीला 288 पैकी 236 जागांवर यश मिळाले. यात भाजपला 132, शिवसेनेला 57, तर राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या. याशिवाय भाजपच्या मित्रपक्षांना पाच, तर शिंदेंच्या मित्रपक्षांना एका जागेवर यश आले आहे.
महाविकास आघाडीच्या वाट्याला 46 जागा आल्या आहेत. यामध्ये काँग्रेसला 16, राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांना 10 जागा, तर शिवसेना (ठाकरे गट) 20 जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या असून मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण आणि कुणाची मंत्रिपदी वर्णी लागणार याबाबत चर्चा सुरु झाल्या असतानाच आता मंत्रिपदाचा फॉर्म्युला समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीचा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला 21-12-10 असा राहण्याची शक्यता आहे. यात सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला सर्वाधिक म्हणजे 21 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. या सूत्रावर प्राथमिक चर्चा झाली असून तिन्ही पक्षांचे मुख्य नेते दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील. त्यानंतर यामध्ये बदल देखील होऊ शकतो.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपत असल्यामुळे एक दिवस आधीच महायुती सरकार स्थापन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री कोण होणार हे पुढील तीन दिवसांतच स्पष्ट होईल, असे दिसून येते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे.
तसेच पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून चर्चा करतील. आम्ही जशी निवडणूक लढलो तसा मुख्यमंत्रीपदाबाबतही एकत्र चर्चा करुन निर्णय घेऊ, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.